जिल्हा परिषद शाळांनाही मिळणार माध्यान्ह भोजन : आयुष प्रसाद

कोटमदरा मध्यवर्ती स्वयंपाकगृहातून होणार प्रयोजन
मंचर – घोडेगाव (ता. आंबेगाव) येथील आदिवासी विद्यार्थी आश्रमशाळा आणि वसतीगृहांसाठी घोडेगाव कोटमदरा येथे होत असलेले मध्यवर्ती स्वयंपाकगृह लवकरच सुरू होत असून, यातून जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना देखील मध्यान्ह भोजन देता येऊ शकते. यासाठी गटविकास अधिकाऱ्यांनी माहिती गोळा करावी, अशा सूचना पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिल्या.
घोडेगाव येथे असलेल्या चार जिल्ह्यांच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातील विविध योजनांचा आढावा आणि चर्चा करण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी घोडेगाव येथील प्रकल्प कार्यालयात बैठक घेतली. या बैठकीस प्रकल्प अधिकारी बळवंत गायकवाड, जुन्नर, आंबेगाव, खेड आणि मावळचे गट विकास व गटशिक्षण अधिकारी उपस्थित होते. यावेळी विविध विषयांवर चर्चा झाली. यामध्ये प्रधानमंत्री आदर्श ग्राम विकास योजनेअंतर्गत समावेश असलेल्या पुणे जिल्ह्यातील 17 गावांचे प्रस्ताव आठ दिवसांत गटविकास अधिकाऱ्यांनी द्यावेत.
आदिम जमाती घरकुल योजनेमधून 86 घरांचा लक्षांक शिल्लक आहे. पारधी जमातीकरीता 2017-18 मधील 28 घरांचा लक्षांक शिल्लक आहे. यासाठी लवकरात लवकर जागा उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या गेल्या. ठक्करबाप्पा योजनेतंर्गत सुरू असलेली कामे लवकर पूर्ण करावीत. इंगळुन येथील छोटा सिमेंट बंधारा बांधण्याची वर्क ऑर्डर देण्यात आली आहे.
हे काम लवकर सुरू करावे, तसेच भोर तालुक्यातील शासकीय आश्रमशाळा कुरूंजी आणि पांगारी या शाळांसाठी पाणीपुरवठा योजना मंजूर आहेत. याच्या वर्क ऑर्डर देखील झाल्या असून लवकर कामे सुरू करावीत, तसेच आंबेगावमधील गोहे व जुन्नर तालुक्यातील मुथाळणे या शाळा जलजीवन मिशनअंतर्गत गावासाठी होणाऱ्या पाणीपुरवठा योजनेमधून जोडाव्यात, अशा सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिल्या.
“जलजीवन’चा पाणीपुरवठा
दहा हजार मुलांना एकाचवेळी जेवण देता येऊ शकेल, असे मध्यवर्ती स्वयंपाकगृह घोडेगाव जवळील कोटेमदरा येथे बांधून पूर्ण झाले आहे, हे लवकरच सुरू होणार आहे. यातून जिल्हा परिषदेतील विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन देण्याचा विचार आहे, तसेच या मध्यवर्ती स्वयंपाकगृहासाठी जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा करण्याची योजना प्रस्तावित आहे.





