धक्कादायक! ठाण्यात माध्यान्य भोजनातून 45 विद्यार्थ्यांना विषबाधा

ठाणे – ठाण्यातील मनिषा नगर येथील सहकार विद्या प्रसारक मंडळातील शाळेत माध्यान्य भोजनातून विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यात ४८ विद्यार्थ्यांना अन्नतून विषबाधा झाली असून सर्वांना उपचारासाठी छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
मनिषा नगर दत्तवाडी येते सहकार विद्या प्रसारक मंडळाची ही शाळा आहे. राज्य शासनाकडून दिला जाणार माध्यान्य पोषण आहार या शाळेतही दिला जातो. आज मंगळवारी या शाळेत हा पोषण आहार दिला गेला त्यामध्ये भात, डाळ आणि मटकीची उसळ आदीचा समावेश होता. हा आहार देत असतानाच काही विद्यार्थ्यांना अन्नाच्या वासानेच मळमळल्यासारखे झाले. तर काहींना अन्न खाल्यानंतर उलटी, पोटदुखीचा त्रास सुरु झाला. या विद्यार्थ्यांना तत्काळ महापालिकेच्या छत्रपती शिवाजी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
डॉक्टरांनी मुलांना तपासले असता त्यांना अन्नातून विषबाधा झाल्याचे उघडकीस आले. शाळा प्रशासनानेही विद्यार्थ्यांच्या पालकांना याबद्दल माहिती दिली त्यामुळे पालकांनी रुग्णालयात धाव घेतली. आजच्या पोषण आहारातील मटकीच्या उसळीमधील मटकी ही दोन ते तीन दिवस भिजत ठेवल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे त्या उसळीचा त्रास विद्यार्थ्यांना झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.
दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे संबंधित पोलिसांनी सांगितले. ( mid-day meal)





