zika virus update : “झिका’साठी आरोग्य पथक अजूनही सक्रिय

बेलसर- केंद्रीय पथकाद्वारे सलग दोन दिवस पुरंदर तालुक्यातील डेंग्यू चिकनगुनिया आणि साथीच्या आजारांच्या संदर्भात धडक सर्वेक्षण करण्यात आले. तिसऱ्या दिवशी जिल्हास्तरीय बैठका घेऊन जिल्ह्यातील पथकाने परिस्थिती जाणून घेतली.
पुरंदर तालुक्यातील गावांमध्ये साथीचे आजार व इतर रोग जास्त प्रमाणात होते अशा गावातील सरपंच आणि इतर पदाधिकारी प्रशासनासंदर्भात ऑनलाइन बैठकीच्या माध्यमातून आढावा बैठक होणार आहे.
केंद्रीय पथकाने केलेल्या
निर्देशानुसार गावामध्ये स्थानिक प्रशासनाकडून आणि आरोग्य विभाग, ग्रामपंचायतीकडून स्वयंसेवक नेमून सर्वेक्षण केले जाणार आहे त्यासाठी बेलसर ग्रामपंचायत यांच्या कडून गावातील तरुणांना स्वयंसेवक म्हणून कार्य करण्यासाठी समोर यावे असे आवाहन करण्यात आले आहे.
गावातील तरुण आशा वर्कर्स ग्रामपंचायत सदस्य, बालवाडी शिक्षिका, आरोग्य सेवक आणि इतर शिक्षक यांच्या सहयोगातून सर्वेक्षणासाठी टीम स्थापन करणार आहेत.
मागील अनेक दिवसांपासून तालुक्यामध्ये अनेक गावे ही हॉटस्पॉट म्हणून घोषित केली आहेत. त्याच अनुषंगाने डेंग्यू चिकनगुनिया मलेरिया आणि झिका विषाणूला हरवण्यासाठी सर्वच गावांमध्ये उपायोजना उभ्या करण्यासाठी आरोग्य विभाग आणि ग्रामपंचायत यांना निर्देश देण्यात आले आहेत.
परंतु सद्यस्थितीला वाढता चिकनगुनिया, डेंगू, मलेरियाचा प्रादुर्भाव पाहता प्रशासनाने आणि ग्रामपंचायतीने सतर्क राहणे गरजेचे आहे. त्याच अनुषंगाने आणि परिसरातील सर्व गावांमध्ये सर्वेक्षणाचे काम नियमित सुरू आहे. दरम्यान, बेलसरमधील “झिका’मुळे आरोग्य विभाग आजही अलर्ट राहून काम करीत असल्याचे दिसत आहे.





