Zika Virus : राज्यात आढळला पहिला झिका संसर्गित; आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचे मोठे विधान

जालना – केरळमध्ये सध्या डोके वर काढलेल्या झिका विषाणूचा राज्यातील पहिला संसर्गित पुरंदर तालुक्यातील बेलसर या गावात आढळला आहे. याबाबतचे वृत्त तालुक्यात पसरताच एकच खळबळ उडाली. मात्र, नागरिकांनी त्याबाबत काळजी करण्याची गरज नाही. या आजाराच्या रुग्णामध्ये जी लक्षणं आढळली आहेत त्यानुसार उपचार केले जात आहेत. अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
साठलेल्या पाण्यावर एडीस प्रजातींच्या डासांची उत्पत्ती होते. त्यांची उत्पत्ती होऊ नये म्हणून आवश्यक पावले उचलून सर्वेक्षण करण्याचे आदेश आरोग्य विभागाला देण्यात आले आहेत. पावसाळा सुरु झाल्यावर पाणी साचते त्यामुळे डेंग्यू, चिकनगुनिया सारखे साथीचे आजार पसरू शकतात. म्हणून सर्वांनी स्वच्छतेवर भर द्यावा, प्रतिबंधात्मक उपाय करावे. राज्याचा आरोग्य विभाग याबाबत योग्य कारवाई करेल, असेही आरोग्यमंत्री टोपे यांनी सागितले.
दरम्यान, बेलसरमध्ये झिकाचा रुग्ण आढळल्यानंतर या गावात जिल्हा प्रशासनाच्या आरोग्य विभागाने आपला तळ ठोकला आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी या गावास भेट देऊन आरोग्य विभागाच्या कामाची पाहणी केली आहे. बेलसरपासून पाच किमी त्रिजेच्या क्षेत्रात सतर्कता बाळगण्याचा इशारा देण्यात आला आहे.





