युक्रेन शांतता परिषदेतील सहभागाचे झेलेन्सकी यांचे आवाहन; चीनकडून अडथळा आणला जात असल्याचा केला आरोप

सिंगापूर – रशिया आणि युक्रेन दरम्यानचा संघर्ष समाप्त करण्याच्या उद्देशाने आयामी काळात स्वित्झर्लंडमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या परिषदेत सहभागी होण्याचे आवाहन युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्सकी यांनी आशिया खंडातील प्रमुख देशांना केले आहे. सिंगापूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या शाग्री-ला या आशियातील प्रमुख देशांच्या सुरक्षा परिषदेमध्ये त्यांनी हे आवाहन केले.
दोन आठवड्यांनी स्वित्झर्लंडमध्ये होणाऱ्या शांतता परिषदेला उपस्थित राहण्याचे अद्यापही अनेक देशांच्या नेत्यांनी निश्चितपणे कळवलेले नाही, यामुळे आपण निराश झाल्याचे झेलेन्सकी यांनी सांगितले. सुमारे ४० देशांच्या ६०० उच्चपदस्थांना ते संबोधित करत होते.
त्यांनी कोणत्याही देशाचे नाव घेतले नाही.
मात्र त्यांचा रोख रशियाचा मित्र देश असलेल्या चीनकडे होता, हे उघड आहे. चीनचे संरक्षण मंत्री डोंग जुन यांनी आदल्या दिवशी शांग्री-ला परिषदेत भाषण केले. मात्र झेलेन्सकी यांनी या परिषदेतल्या नेत्यांना आवाहन केले, तेंव्हा ते सभागृहामध्ये उपस्थित राहिले नव्हते.
युक्रेनने शांततेचासाठी शिखर परिषदेत आणण्याचे प्रस्ताव ठेवला आहे. आण्विक सुरक्षा, अन्न सुरक्षा, युद्धकैद्यांची सुटका आणि रशियाने अपहरण केलेल्या युक्रेनियन मुलांना परत आणले जावे, हे युक्रेनचे उद्दिष्ट आहे, असे ते म्हणाले.
स्वित्झर्लंडच्या पुढाकारातून आयोजित होणाऱ्या युक्रेन शांतता परिषदेत चीनकडून अडथळा आणला जात असल्याचा आरोपही झेलेन्सकी यांनी नंतर पत्रकार परिषदेत केला. शांतता परिषदेत सहभागी न होण्यासाठी चीनकडून अन्य देशांवर दबाव आणला जात आहे.
चिनी प्रभावाचा वापर करून, चिनी मुत्सद्दींचा देखील वापर करून, शांतता शिखर परिषदेत व्यत्यय आणण्यासाठी रशिया सर्व काही करतो आहे. दुर्दैवाने चीन सारखा मोठा आणि ताकदवान देश देखील रशियाच्या हातातले बाहुले बनला आहे, असे ते म्हणाले,





