व्लादिमीर पुतिन यांच्यानंतर आता वोलोदिमिर झेलेन्स्की भारतात येणार ; दौऱ्यातून ट्रम्प यांना स्पष्ट संदेश?

Zelensky India Visit। रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या अलिकडच्या भारत भेटीनंतर, युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की भारत भेटीवर येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्या भारत भेटीचे सर्व तयारी सुरु करण्यात आली आहे. जर सर्व नियोजन योग्यपद्धतीने झाले तर झेलेन्स्की पुढील वर्षाच्या सुरुवातीला भारताला भेट देऊ शकतात, असे सांगण्यात येत आहे. या भेटीची अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नसली तरी, पुतिन यांच्या भेटीनंतर सुमारे एक महिन्यानंतर ही भेट होण्याची शक्यता आहे.
झेलेन्स्की यांचा हा दौरा रशिया-युक्रेन संघर्षात भारताचे संतुलित राजनैतिक धोरण अधिक मजबूत करण्याची संधी असणार आहे. युक्रेनवर संघर्ष संपवण्यासाठी दबाव आणणाऱ्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनाही या दौऱ्यातून स्पष्ट संदेश दिला जाणार असल्याचे म्हटले जात आहे.
२०२६ च्या सुरुवातीला झेलेन्स्कीचा भारत दौरा Zelensky India Visit।
एका इंग्रजी वर्तमानपत्राच्या वृत्तानुसार, भारतीय आणि युक्रेनियन अधिकाऱ्यांमध्ये गेल्या अनेक आठवड्यांपासून चर्चा सुरू आहे. पुतिन यांच्या भारत भेटीपूर्वी नवी दिल्लीने झेलेन्स्कीच्या कार्यालयाशी संपर्क साधला होता. शांतता राखण्यात प्रभावी भूमिका सुनिश्चित करण्यासाठी भारताचे दोन्ही देशांशी संवाद कायम ठेवण्याचे उद्दिष्ट आहे.
भारत-युक्रेन संबंधांची पार्श्वभूमी देखील महत्त्वाची आहे. जुलै २०२४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाला भेट दिली आणि पुतिन यांची भेट घेतली. त्यानंतर बरोबर एक महिन्यानंतर, ऑगस्ट २०२४ मध्ये, पंतप्रधान मोदींनी भारतीय पंतप्रधान म्हणून पहिल्यांदाच युक्रेनला भेट दिली आणि झेलेन्स्की यांची भेट घेतली. त्यावेळी जारी केलेल्या संयुक्त निवेदनात, दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंधांना “सामरिक भागीदारी” पर्यंत वाढवण्याची इच्छा व्यक्त केली.
अमेरिकेच्या शांतता योजनेदरम्यान भेट Zelensky India Visit।
युक्रेनमधील भारतीय राजदूत ओलेक्झांडर पोलिशचुक यांनी ऑगस्ट २०२५ मध्ये सांगितले की पंतप्रधान मोदींनी झेलेन्स्की यांना भारत भेटीसाठी आमंत्रित केले आहे आणि दोन्ही बाजू या भेटीसाठी योग्य तारीख निश्चित करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, भेटीची वेळ अमेरिकेच्या शांतता योजनेवर, युद्ध परिस्थितीवर आणि युक्रेनच्या अंतर्गत राजकारणावर अवलंबून असेल. झेलेन्स्कीचे जवळचे सहकारी आणि चीफ ऑफ स्टाफ आंद्री येरमाक यांचा अलिकडचा राजीनामा देखील याच संदर्भात घडला.
झेलेन्स्की जानेवारी २०२६ मध्ये भारतात आले तर भारताची राजनैतिक रणनीती आणखी मजबूत होईल. त्यासोबतच रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांशी संवाद साधणारा शांतताप्रिय देश म्हणून स्थापित होईल. या भेटीमुळे भारत-युक्रेन संबंधांना नवीन उंचीवर नेण्यास मदत होईल.





