Zeenat Aman: जीनत अमानने शेअर केले हेलेन आणि बादशाहसोबतचे खास फोटो; चाहत्यांना विचारला खास प्रश्न

Zeenat Aman : दिग्गज अभिनेत्री जीनत अमान सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. नुकतीच त्यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर इंडियन आयडलच्या सेटवरील काही खास फोटो शेअर करत चाहत्यांशी मनमोकळेपणाने संवाद साधला. या पोस्टमध्ये त्यांनी हेलेन आणि रॅपर बादशाहसोबतचे सुंदर क्षण शेअर करत आपली भावना व्यक्त केली आहे.
जीनत अमान यांनी शेअर केलेले हे तीन फोटो इंडियन आयडल सीझन १६च्या सेटवरील आहेत. पहिल्या फोटोमध्ये रॅपर आणि शोचा परीक्षक असलेल्या बादशाहने काढलेलं एक डूडल आहे. दुसऱ्या फोटोमध्ये जीनत अमान आणि ज्येष्ठ अभिनेत्री हेलेन हसताना दिसत आहेत, तर तिसऱ्या फोटोमध्ये जीनत अमान इंडियन आयडलचे परीक्षक श्रेया घोषाल, विशाल ददलानी आणि बादशाहसोबत दिसत आहेत. या फोटोमध्ये कार्तिक आर्यन आणि अनन्या पांडेही नजर येतात.
View this post on Instagram
या फोटोंसोबत जीनत अमान यांनी एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. त्यांनी सांगितलं की आता त्या अशा वयात पोहोचल्या आहेत, जिथे त्यांची मुलं त्यांची काळजी घ्यायला लागली आहेत. मुलांनी त्यांना नीट सेल्फी काढायला शिकण्याचा आणि सोशल मीडियाचा योग्य वापर करत स्वतःवर अवलंबून राहण्याचा सल्ला दिला, असंही त्यांनी नमूद केलं.
मात्र, मुलांनी त्यांच्या काढलेल्या फोटोंवर नाराजी व्यक्त केल्यामुळे त्यांना थोडं वाईटही वाटल्याचं जीनत अमान यांनी लिहिलं. अखेरीस त्या फोटोंना डिलीट करण्यात आलं, पण त्यांनी स्वतः काढलेले आणि मुलांच्या मदतीशिवाय पोस्ट केलेले हे तीन फोटो चाहत्यांसोबत शेअर केले.
या पोस्टमध्ये जीनत अमान यांनी हेलेन आणि बादशाहसाठीही खास शब्द लिहिले आहेत. त्यांनी हेलेन यांचं सौंदर्य आणि ग्रेसफुल व्यक्तिमत्त्वाचं कौतुक केलं, तर बादशाहने बनवलेल्या डूडलसाठी त्याचे आभार मानले. पोस्टच्या शेवटी जीनत अमान यांनी चाहत्यांना एक खास प्रश्न विचारला आहे, “तुमची सर्वात आवडती पब्लिक फिगर किंवा सेलिब्रिटी कोण आहे आणि का?”
जीनत अमान यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत असून चाहत्यांकडून तिला भरभरून प्रतिसाद मिळतो आहे.





