आपल्या बायोपिकसाठी कोणत्या अभिनेत्याची निवड करणार? अजित पवारांनी घेतलं चर्चेतलं नाव, पाहा….

Ajit Pawar । मराठी चित्रपटसृष्टी ज्याची आतुरतेने वाट पाहत असते असा प्रतिष्ठित ‘झी गौरव पुरस्कार 2024’ हा सोहळा नुकताच मोठ्या दिमाखदार आणि धमाकेदार पद्धतीने साजरा झाला. यावर्षीच्या ‘झी चित्र गौरव पुरस्कार 2024’ सोहळ्याचं खास आकर्षण म्हणजे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार. । Zee Chitra Gaurav Puraskar 2024
यावेळी अजित पवार यांची विशेष उपस्थिती होती. या पुरस्कार सोहळ्यात अवधूत गुप्तेंनी उपमुख्यमंत्र्यांची मुलाखत घेतली. अजित पवार देखील अवधूत गुप्तेंनी विचारलेल्या प्रश्नांना सामोरे गेले. त्यांनी अतिशय खुमासदारपणे आणि मनोरंजकपणे त्यांचा सर्व प्रश्नांची उत्तरे दिली.
चित्रपटांच्या आवडीविषयी सांगताना अजित पवार म्हणाले, “मी जास्त चित्रपट पाहत नाही. पण कॉलेजच्या काळात मला अमिताभ बच्चन आवडायचे, नंतरच्या काळात शाहरुख खान आला, त्यामुळे वयानुसार आवड बदलत असते.” असं अजित पवार म्हणाले. या कार्यक्रमात अजित दादांनी त्यांच्या काही जुन्या आठवणीही ताज्या केल्या.
पुढे अवधूत गुप्तने, ‘जर तुमच्यावर बायोपिक करायचा म्हटलं तर कोणी अभिनय करावा?’ असा प्रश्न विचारला. त्यावर अजितदादांनी डॉक्टर निलेश साबळे यांचे नाव घेतले. त्यावेळी साबळेंनी अजितदादांची मिमिक्री देखील करून दाखवली. । Ajit Pawar
कार्यक्रमात एक गेम खेळत असताना अवधुत गुप्ते यांनी ‘थंड बर्फ कोणाला द्यावा? जेणेकरून डोक्यावर ठेऊन डोकं शांत केलं जाईल’, असा सवाल विचारला तेव्हा दादांनी पार्थ पवार यांचे नाव घेतले. तर रिमोट कंट्रोल कोणाला द्यावा, असं विचारलं असता “तो माझ्याच हातात राहू द्या” असं म्हणत हशा पिकवला. असे अनेक प्रश्नांची दिलखुलास उत्तरे अजित पवार यांनी यावेळी दिली.





