Yuvraj Singh Sister : युवीच्या बहिणीची भारतीय संघात निवड! कोण आहे एमी ऊर्फ अमरजोत? जाणून घ्या

Yuvraj Singh Sister Amarjot Kaur : भारताचा माजी दिग्गज फलंदाज आणि दोन विश्वचषक विजेत्या युवराज सिंगच्या कुटुंबात आणखी एक आंतरराष्ट्रीय खेळाडूची भर पडली आहे. युवराजची सावत्र बहीण अमरजोत कौर ऊर्फ एमी बुंदेल हिची यंदाच्या आशिया पॅसिफिक पॅडल कप (APPC 2025) साठी भारतीय संघात निवड झाली आहे. ही स्पर्धा यावर्षी ऑगस्ट महिन्यात मलेशियातील क्वालालंपूर येथे होणार आहे.
भारतीय संघात अनुभव आणि युवा जोश –
आशिया पॅसिफिक पॅडल कप 2025 मध्ये भारतीय संघ अनुभवी आणि युवा खेळाडूंच्या मिश्रणासह मैदानात उतरणार आहे. आयोजकांच्या मते, हा पॅडल खेळातील एक मोठा आंतरराष्ट्रीय टूर्नामेंट आहे, ज्यामध्ये अनेक बलाढ्य देशांचे संघ विजेतेपदासाठी लढतील. भारतीय खेळाडू आपल्या ताकदवान सर्व्हिस, वेगवान रॅली आणि अचूक स्मॅशच्या जोरावर प्रतिस्पर्ध्यांना चीतपट करण्यासाठी सज्ज आहेत. युवराज सिंगचे चाहतेही आता या स्पर्धेवर लक्ष ठेवून असतील, कारण त्यांच्या आवडत्या क्रिकेटपटूची छोटी बहीण भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत आहे.
युवराजच्या कुटुंबाची पार्श्वभूमी –
View this post on Instagram
युवराज सिंगचे वडील आणि भारतासाठी एक कसोटी आणि सहा एकदिवसीय सामने खेळलेले योगराज सिंग यांनी दोन विवाह केले आहेत. युवराज लहान असताना योगराज यांनी त्यांच्या पहिल्या पत्नी शबनम यांच्याशी घटस्फोट घेतला होता. त्यानंतर शबनम यांनी एकट्याने युवराज आणि त्यांचा धाकटा भाऊ जोरावर यांचे संगोपन केले. शबनम यांच्याशी घटस्फोट घेतल्यानंतर योगराज यांनी पंजाबी अभिनेत्री नीना बुंदेल यांच्याशी दुसरा विवाह केला.
हेही वाचा – Babar Azam : ‘…म्हणून बाबरला संघातून वगळलं’, पाकिस्तान संघाच्या कोचने सांगितलं खरं कारण, पाहा VIDEO
कोण आहे अमरजोत कौर?
अमरजोत कौर ही योगराज सिंग आणि नीना बुंदेल यांची मुलगी आहे. नीना आपल्या काळातील प्रसिद्ध पंजाबी अभिनेत्री होत्या. आपल्या आईप्रमाणेच अमरजोतही अत्यंत आकर्षक आणि ग्लॅमरस आहे. तिचे इन्स्टाग्रामवर 32,500 हून अधिक फॉलोअर्स आहेत. युवराज आणि जोरावर यांच्याव्यतिरिक्त अमरजोतचा एक सख्खा भाऊ विक्टर सिंग आहे.
हेही वाचा – Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराह आशिया कपसाठी उपलब्ध असणार की नाही? महत्त्वाची अपडेट आली समोर
पॅडल खेळ नक्की काय आहे?
पॅडल खेळाची सुरुवात 1969 मध्ये मेक्सिकोमध्ये झाली. हळूहळू हा खेळ युरोप, संयुक्त अरब अमिराती आणि आता भारतातील मोठ्या शहरांमध्ये लोकप्रिय झाला आहे. पॅडल हा रॅकेटचा खेळ आहे, जो टेनिस आणि स्क्वॉश यांच्या मिश्रणासारखा आहे. हा खेळ मुख्यतः दुहेरी स्वरूपात (डबल्स) खेळला जातो. यात वापरले जाणारे रॅकेट टेनिस रॅकेटपेक्षा लहान आणि जाळीविरहित असते.





