Yuvraj Singh Statement : ‘हे चुकीचं आहे…अभिषेकप्रमाणे माझ्यावरही झाला होता अन्याय!’, युवराज सिंगने व्यक्त केली खंत
Yuvraj Singh Statement : सनरायझर्स हैदराबाद (SRH) संघाने घेतलेल्या एका निर्णयावर भारताचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे

Yuvraj Singh Statement on Abhishek Sharma about SRH Captaincy : आयपीएल २०२६ चा हंगाम सुरू होण्यापूर्वी सनरायझर्स हैदराबाद संघाने घेतलेल्या एका निर्णयावर भारताचा दिग्गज खेळाडू युवराज सिंगने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दुखापतग्रस्त पॅट कमिन्सच्या जागी इशान किशनला हंगामी कर्णधार बनवल्याने, आपला शिष्य अभिषेक शर्मा याच्यावर अन्याय झाल्याची भावना युवीने बोलून दाखवली आहे.
काय म्हणला युवराज सिंग?
सनरायझर्स हैदराबादने आयपीएल २०२६ साठी इशान किशनची कर्णधार म्हणून घोषणा केली, तर अभिषेक शर्माला उपकर्णधारपदावर समाधान मानावे लागले. या निर्णयामुळे युवराज सिंग कमालीचा निराश झाला आहे. ‘स्पोर्ट्स तक’शी बोलताना युवराज म्हणाला, “मला ईशान किशन आवडतो, त्याने प्रगतीही केली आहे. पण ज्या खेळाडूने घरगुती क्रिकेटमध्ये आपल्या राज्याला (पंजाबला) जेतेपद मिळवून दिले, टीम इंडियासाठी वर्ल्ड कप जिंकला, त्याला डावलून दुसऱ्याला कप्तानी देण्याचा आधार काय?”
स्वतःच्या कटू आठवणींना दिला उजाळा –
युवराजने अभिषेकला कप्तानी न मिळण्यावरून स्वतःच्या करिअरमधील संघर्षाची आठवण करून दिली. तो म्हणाला, “अभिषेक ७ वर्षांपासून एकाच फ्रँचायझीसाठी रक्त आटवत आहे, त्याने सलग धावा केल्या आहेत. अशा वेळी कप्तानी न मिळाल्यास खेळाडूच्या मानसिकतेवर काय परिणाम होतो, याची मला कल्पना आहे. माझ्यासोबतही असं घडलं आहे आणि ती वेदना मोठी असते.” अभिषेकने मात्र इशानसोबत आपले संबंध चांगले असल्याचे सांगत प्रगल्भता दाखवली आहे.
निराशेचे रूपांतर विजयात करा; युवीचा गुरूमंत्र
युवराजने अभिषेकला या परिस्थितीतून सावरण्यासाठी मोलाचा सल्ला दिला आहे. “मी अभिषेकशी स्पष्ट बोललो आहे. तुला कप्तानी मिळाली नाही ही निराशा एका बाजूला ठेव. आता तुझी प्रेरणा ही असायला हवी की, तुला दुखावले गेले आहे, म्हणून तू मैदानात अधिक ताकदीने उतरशील आणि हैदराबादला विजय मिळवून देशील,” असे युवीने सांगितले. इशान किशनच्या नेतृत्वाखाली हैदराबाद कशी कामगिरी करते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.





