Kevin Pietersen Predictions : ‘यंदा RCB, CSK नव्हे तर, हे चार धुरंधर संघ प्लेऑफमध्ये पोहोचणार…!’, माजी खेळाडू केविन पीटरसनचं मोठं भाकीत
Kevin Pietersen Predictions : अवघ्या ६ सामन्यांनंतरच इंग्लंडचा माजी दिग्गज फलंदाज केविन पीटरसन याने प्लेऑफच्या शर्यतीबाबत एक खळबळजनक भाकीत वर्तवले आहे

Kevin Pietersen IPL 2026 Playoff Predictions : आयपीएल २०२६ चा थरार नुकताच सुरू झाला असून सर्व १० संघांनी आपापला पहिला सामना खेळला आहे. अवघ्या ६ सामन्यांनंतरच इंग्लंडचा माजी दिग्गज फलंदाज केविन पीटरसनने प्लेऑफच्या शर्यतीबाबत एक खळबळजनक भाकीत वर्तवले आहे. पीटरसनने निवडलेल्या ४ संघांच्या यादीतून त्याने काही दिग्गज संघांना बाहेर ठेवल्याने क्रिकेट वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
केविन पीटरसनने काय केलं भाकीत?
आयपीएल २०२६ च्या पहिल्या फेरीचे सामने पाहिल्यानंतर केविन पीटरसनने प्लेऑफमध्ये पोहोचणाऱ्या संभाव्य चार संघांची नावे जाहीर केली आहेत. पीटरसनच्या मते, यंदा मुंबई इंडियन्स (MI), दिल्ली कॅपिटल्स (DC), राजस्थान रॉयल्स (RR) आणि पंजाब किंग्स (PBKS) हे चार संघ अंतिम चारमध्ये स्थान मिळवू शकतात. विशेष म्हणजे, पीटरसनने दिल्ली कॅपिटल्सचे मेंटर म्हणून काम पाहिले असल्याने त्याने आपल्या अनुभवाच्या जोरावर ही निवड केली आहे.
गतविजेत्या आरसीबीलाही स्थान नाही!
Having watched the first round of matches in the IPL this season, as it stands, just on observations, this could be the top 4.
MI, DC, RR, PUNJAB
This can all change with injuries etc, but that’s how I see it atm.
— Kevin Pietersen🦏 (@KP24) April 3, 2026
गेल्या हंगामातील विजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाला पीटरसनने आपल्या यादीतून वगळले आहे. आरसीबीने जरी पहिल्या सामन्यात हैदराबादवर विजय मिळवला असला, तरी मधली षटके, दर्जेदार फिरकीपटूंची कमतरता आणि वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडची फिटनेस ही आरसीबीसाठी चिंतेची बाब ठरेल, असे पीटरसनने ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटले आहे. तसेच, चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR) यांना विजेतेपदाच्या शर्यतीत टिकण्यासाठी काहीतरी विलक्षण कामगिरी करावी लागेल, असा इशाराही त्याने दिला आहे.
“कोणताही स्कोअर सुरक्षित नाही” –
पीटरसनच्या मते, यंदा फलंदाजांचे वर्चस्व इतके वाढले आहे की २०० पेक्षा जास्त धावांचा पाठलाग करणे सोपे झाले आहे. “या हंगामात पहिल्या डावात सुरक्षित धावसंख्या नेमकी किती असावी, हेच फलंदाजांना समजेनासे झाले आहे. टॉसची भूमिकाही आता अत्यंत कळीची ठरत आहे,” असे मत त्याने नोंदवले. सध्या गुणतालिकेत राजस्थान रॉयल्स अव्वल स्थानी असून त्यांचा नेट रनरेट ४.१७१ इतका जबरदस्त आहे. आता पीटरसनचे हे भाकीत किती खरे ठरते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.





