हॉर्न वाजवल्याने बिघडला युट्यूबरचा मूड! प्रियंका गांधींचा ताफा रोखला, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

त्रिशूर – काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वढेरा यांचा ताफा रोखल्याच्या आरोपाखाली एका युट्यूबरला अटक करण्यात आली आहे. या घटनेच्या संदर्भात, मन्नूथी पोलिसांनी एलानाडू येथील रहिवासी अनीश अब्राहम याला अटक केली आणि नंतर त्याला पोलिस ठाण्यातून जामिनावर सोडण्यात आले. त्याची गाडीही जप्त करण्यात आली आहे.
शनिवारी रात्री ९.३० च्या सुमारास मन्नूथी बायपास जंक्शनवर ही घटना घडली. प्रियंका गांधी त्यांच्या मतदारसंघातील आणि मलप्पुरम जिल्ह्यातील अनेक कार्यक्रमांना उपस्थित राहिल्यानंतर वंदूर, मलप्पुरम येथून कोची विमानतळाकडे जात होत्या. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियंका यांच्या पायलट वाहनाच्या हॉर्नमुळे संतापलेल्या आरोपीने त्याची गाडी ताफ्यासमोर थांबवली होती.
मन्नूथी पोलिस स्टेशनच्या उपनिरीक्षकांच्या नेतृत्वाखालील पोलिस पथकाने त्याला हटवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याची त्यांच्याशी झटापट झाल्याचे वृत्त आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध जाणूनबुजून ताफ्यात घुसणे, लोकांचे जीव धोक्यात घालणे आणि पोलिसांच्या सूचनांचे उल्लंघन केल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे.





