प्रभात वृत्तसेवा फलटण – फलटण शहरातील आळंदी पंढरपूर मार्गावर नयारा पेट्रोल पंपासमोर पांडुरंग कुंभार यांच्या गळ्याला चायनीज मांजाने कापले असून तब्बल 18 टाके पडल्याची माहिती डॉ. रवींद्र बिचुकले यांनी दिली. दरम्यान, फलटण शहरातील एक युवक पतंग उडवत असताना विजेच्या तारांना चिकटून मोठ्या प्रमाणावर भाजला असून त्याला अधिक उपचारासाठी बारामती येथे दाखल करण्यात आले आहे. फलटण शहर व उपनगरे येथे प्रचंड मोठ्या प्रमाणात चायना मांजाची विक्री करण्यात आली असून पोलिसांनी केलेल्या कारवाईत अगदी नाममात्र चायनीज मांजा पकडण्यात आला. मात्र, उंच इमारतीवरून हजारो लोकांनी मोठ्या प्रमाणात मांजा वापरत नागरिक, पशुपक्ष्यांच्या जीवितास धोका निर्माण केल्याने हा चायनीज मांजा विक्री करणारे पोलिसांच्या रडारवर केव्हा येणार व त्यांच्यावर कधी कठोर कारवाई करणार असा प्रश्न फलटणकर विचारत आहेत.पोलिसांनी गेले तीन ते चार दिवस चायनीज मांजा पकडण्यासाठी मोहीम हाती घेतली होती. मात्र, त्याला अल्प प्रतिसाद मिळत अनेकांनी पोलिसांना गुंगारा देत मोठ्या प्रमाणात चायना मांजाने पतंग उडवली जात आहे. यातून पांडुरंग कुंभार पूर्ण नाव माहित नाही यांच्या गळ्याला मोठ्या प्रमाणात इजा झाली असून त्यांचा जीव थोडक्यात वाचला आहे.फलटण शहरातील नागपंचमीच्या दिवशी हजारोंनी चायनीज मांजाचा वापर केला. त्या दरम्यान अशी चर्चा होती की “सत्तर हजार द्या अन् द्या मांजा विका नाहीतर गांजा विका” यामुळे फलटण शहरांमधील सामाजिक कार्यकर्ते मोठ्या आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.