Haveli Temperature – हवेली तालुक्याच्या पूर्व भागात वाढत्या तापमानाने नागरिकांचे जगणे असह्य केले असून लोणी काळभोर परिसरात सोमवारी तब्बल 42 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. प्रखर उन्हामुळे रस्त्यांवर दुपारच्या वेळी शुकशुकाट दिसून येत असून नागरिक, शेतकरी तसेच पशुपक्षी उष्णतेने त्रस्त झाले आहेत. मुळा-मुठा नदी तसेच मुठा उजवा व जुना कालव्याच्या पाण्यावर अवलंबून असलेला हा बारमाही बागायती पट्टा यंदा तीव्र उष्णतेने होरपळून निघत आहे. उन्हाच्या झळांमुळे शेतकर्यांनी कामाचे वेळापत्रक बदलले असून सकाळी लवकर आणि सायंकाळी उशिरा शेतातील कामे केली जात आहेत. विहिरींची पाणीपातळी घटत असताना कालव्याचे पाणी बंद होण्याची शक्यता व्यक्त होत असल्याने शेतकर्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. उष्णतेचा फटका जनावरांनाही मोठ्या प्रमाणावर बसत आहे. मका व कडवळ यांसारख्या चार्यांचे दर वाढल्याने दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. जनावरांना झाडांच्या सावलीत किंवा गोठ्यात ठेवून पाणी व चार्याची व्यवस्था केली जात आहे. पाण्याच्या शोधात पक्षीही विहिरी आणि ओलसर भागांकडे धाव घेताना दिसत आहेत. चारा टंचाई (संग्रहित छायाचित्र) दरम्यान, वाढत्या उकाड्यामुळे रसवंतीगृहे, आईस्क्रीम पार्लर आणि शीतपेय विक्रेत्यांकडे गर्दी वाढली आहे. नागरिकांकडून गॉगल, टोपी, सुती कपडे यांचा वापर वाढला असून घराघरांत कूलर, एअर कंडिशनर आणि फ्रिजचा वापरही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मात्र वारंवार खंडित होणार्या वीजपुरवठ्यामुळे नागरिकांचा संताप वाढत आहे. लोणी काळभोर परिसरातून जाणार्या जुन्या कालव्यातील दूषित पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून नवीन मुठा उजव्या कालव्याचे आवर्तन बंद झाल्यास उभी पिके जळून जाण्याची भीती शेतकर्यांनी व्यक्त केली आहे. पुणे महानगरपालिका आणि जलसंपदा विभागाने समन्वयाने पाणीपुरवठा सुरळीत ठेवावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. उन्हाच्या झळांमुळे स्थानिक बाजारपेठेतील व्यवहारांवरही परिणाम झाला असून सकाळी 11 नंतर बाजारपेठ ओस पडत आहे. यात्रा-जत्रांच्या उत्साहावरही उष्णतेचे सावट आले आहे. हवामान विभागाने मे महिनाभर उष्णतेचा इशारा दिल्याने नागरिकांनी पुरेसे पाणी पिणे, दुपारच्या उन्हात बाहेर पडणे टाळणे आणि आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.