“तुझा बाप चिटर….”; शिंदेंच्या आमदाराचा अनिकेत तटकरेंवर जिव्हारी लागणारा वार

Mahendra Dalvi : रायगड जिल्ह्यातील पालकमंत्री पदाचा वाद अद्याप मिटलेला नाही. महायुतीमधील राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावर दावा केला जात आहे. हा वाद कधी मिटणार याकडे लक्ष लागलेले असतानाच आता रायगड जिल्ह्यातील राजकीय वातावरण आणखी एका कारणामुळे चर्चेत आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून शिदेंसेनेचे आमदार महेंद्र दळवी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यात राजकीय तेढ निर्माण झाला असून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. अनिकेत तटकरे यांनी आमदार दळवी यांना चिटर म्हटलं होते. यावर प्रत्युत्तर देताना महेंद्र दळवींनी देताना तुझा बाप चिटर आहे असल्याचा जोरदार हल्लाबोल केला आहे.
यामुळे महायुतीतील सेना आणि राष्ट्रवादीमधील मतभेद आणखी तीव्र झाल्याचे चित्र आहे. मी अनेक केसेस डोक्यावर घेऊन आमदार झालोय, त्यामुळे यापुढे कोणी आमच्या कार्यकर्त्या फोन अथवा काही बोलत असतील तर ते कदापि चालणार नाही असा थेट इशारा आमदार महेंद्र दळवी यांनी रोहा येथे आयोजित एका कार्यक्रमात विरोधकांना दिला आहे.
यावेळी त्यांनी खासदार सुनील तटकरे आणि माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्यावर घणाघाती टीका केली. आपल्याला तटकरे घराणे खालसा करायचे आहे. तटकरे कुटुंब बाहेरच्या कोणा व्यक्तीला उमेदवारी देत नाहीत. सर्व काही घराण्यातच ठेवल जातं, असा गंभीर आरोप दळवींनी तटकरेंवर केला. आगामी काळातील निवडणुकीची युती महायुती वगैरे होतच राहील. परंतु आमची येथे ताकद असल्याने आता आम्ही येथे वारंवार येत राहू असेही आमदार महेंद्र दळवी म्हणाले आहेत.
आमदार महेंद्र दळवी यांनी थेट सुनील तटकरे यांच्या बालेकिल्ल्यात केलेल्या विधानामुळे राजकारण आणखी तापणार असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला कशा पद्धतीने येथील राजकीय परिस्थिती असणार याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे.





