Sunil Tatkare : सुनील तटकरेंच्या दाव्यामुळे महायुतीत वादाची ठिणगी? म्हणाले “अजित पवारांनी लाडकी बहीण योजना आणल्यानेच…”

Sunil Tatkare : राज्यात महायुत्ती पुन्हा सत्तेवर येण्यासाठी लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरली. राज्यात मोठा विजय या योजनामुळे महायुतीला मिळाला असल्याचं सांगितलं जातं, पण आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना आणल्यानेच राज्यात महायुतीला २३८ जागा मिळाल्याचा दावा केला आहे. यामुळे आता त्यांनी केलेल्या दाव्यामुळे महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
खोचक टोला
लाडकी बहीण योजना फसवी असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला. यावर भाष्य करताना तटकरेंनी विरोधकांना सुनावलं आहे. महिलांचा स्वाभिमान दीड हजार रुपयांत विकत घेण्यात आला, असा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. पण जी व्यक्ती सोन्याचा चमचा घेऊन आली आहे तिला ही योजना काय समजणार, असा खोचक टोल तटकरेंनी लगावला आहे.
गंभीर आरोप
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतदार यादींवरून अनेक आरोप केले आहेत. यावर देखील तटकरे यांनी आपलं मत व्यक्त केलं. मतदार याद्यांमध्ये काहीही घोळ नाही. यादींवर सूचना हरकती मांडण्यास वेळ मिळतो. राजकीय पक्षांना त्यासाठी पुरेसा वेळही दिला. परंतु, विरोधकांकडून फेक नॅरेटिव्ह पसरवला जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
हेही वाचा : Ajit Pawar : ‘मी त्या बैठकीत नव्हतो’, सूरज चव्हाणांच्या नियुक्तीवर अजित पवारांचं स्पष्टीकरण





