Mahendra Dalvi । अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्या कारला अपघात झाल्याची घटना घडली आहे. रायगडमधील मुरुड तालुक्यातील उसडी येथे ही दुर्घटना घडली आहे. या अपघातात आमदार दळवी सुखरुप आहेत. पण यात एका मोटार सायकलस्वाराचा मृत्यू झाला आहे. । Mahendra Dalvi | Car Accident
हा अपघात झाला त्यावेळेला आमदार महेंद्र दळवी हे कारमध्ये होते. आमदार महिंद्र दळवी यांच्या कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती रात्री उशिरा रायगड जिल्हा पोलिसप्रशासनातील उच्चपदस्थ अधिकाऱ्याकडून देण्यात आली.
महेंद्र दळवी हे मुरुड -अलिबाग मतदारसंघाचे आमदार आहेत. ते शनिवारी मुरुड- नांदगाव येथील साळाव आगरदांडा रस्त्याच्या भूमीपूजन कार्यक्रमासाठी जात होते. त्यावेळी उसडी गावानजीकच्या टोलनाक्याच्या परिसरात महेंद्र दळवी यांची गाडी आणि जासीम अब्दुल रहेमान पासवारे या व्यक्तीच्या दुचाकीची जोरदार धडक झाली.
यामध्ये जासीम अब्दुल रहेमान पासवारे गंभीररित्या जखमी झाले. त्यांना उपचारासाठी तातडीने मुरुड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेबाबत फारसा तपशील अजून समोर आलेला नाही.
पोलिसांनी सध्या महेंद्र दळवी यांच्या गाडीच्या चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे. तर हा अपघात भीषण होता की दळवी यांच्या गाडीच्या एअर बॅगही धडकेनंतर उघडल्या गेल्या. अपघात झाल्यानंतर दळवी यांना जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.