…अन्यथा तुमच्या कारकिर्दीचा ‘विनोद कांबळी’ होईल; कपिल देव यांचा युवा खेळाडूंना सल्ला

मुंबई – देशातील युवा खेळाडूंनी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा आदर्श ठेवावा. त्याच्याकडून प्रेरणा घ्यावी व त्याने जसे आपल्या खेळावर व कारकिर्दीबाबत गांभीर्य राखले तसेच युवा खेळाडूंनीही राखावे, अन्यथा तुमचा विनोद कांबळी होईल, असा सल्ला वजा इशारा भारताचे महान माजी कसोटीपटू व माजी कर्णधार कपिल देव यांनी दिला आहे.
युवा खेळाडूंनी स्वत:चे लक्ष केंद्रित करावे. 1990 सालच्या सुरुवातीला युवा असताना विनोद कांबळीने भरपूर धावा केल्या आणि त्याच्या जोरावर तो आंतरराष्ट्रीय स्तरावर यशस्वीही झाला, पण नंतर त्याने आपल्या खेळावर व कारकिर्दीबाबत गांभीर्य राखले नाही व त्याच्याकडे अफाट गुणवत्ता असूनही त्याची कारकीर्द वेळेपूर्वीच संपुष्टात आली.
कांबळी व सचिन यांची तुलना करून युवा खेळाडूंनी लक्ष केंद्रित करणे किती महत्त्वाचे असते. कांबळीने भारताकडून 17 कसोटीत 1 हजार 84 धावा केल्या तर 104 एकदिवसीय क्रिकेटमध्ये 2 हजार 477 धावा केल्या. त्याने लागोपाठच्या कसोटीत द्विशतकही साकार केले. इतके असूनही तो सचिनइतका यशस्वी होऊ शकला नाही. मात्र, सचिन क्रिकेट इतिहासातील सर्वाधिक धावा करणारा खेळाडू म्हणून निवृत्त झाला, असेही कपिल म्हणाले.
आवड, कठोर मेहनत आणि वचनबद्धता यांना पर्याय नसतो. सचिन आज सगळ्यांचाच आदर्श आहे, कारण त्याने प्रचंड मेहनत घेतली. सचिन म्हणजे कौशल्य आणि मेहनत याचे उत्तम उदाहरण आहे. जर तुमच्याकडे कौशल्य असूनही योग्य मेहनत घेतली नाही, तर तुम्ही विनोद कांबळीच्याच मार्गावर प्रवास कराल व आपली ओळखही गमावून बसाल. क्रिकेटपटू दोन प्रकारचे असतात. मी सचिन आणि विनोद या दोघांसह खेळलो आहे. दोघेही भारतीय क्रिकेटमध्ये मोठे खेळाडू म्हणून समोर आले. विनोदकडे सचिन इतकीच प्रतिभा होती, तो कुठेच कमी नव्हता, पण जेव्हा त्याचे लक्ष खेळावर हवे होते तेव्हा त्याने अन्य गोष्टींना महत्त्व दिले, असेही ते म्हणाले.





