Shirur News : आंधळगाव येथे तळ्यात बुडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; बकरी धुताना घडली दुर्घटना

शिरूर : शिरूर तालुक्यातील आंधळगाव येथे एका युवकाचा बकरी धुत असताना तोल जावून तळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. साहेबराव चांगदेव पांढरे (वय ३३ वर्ष, रा. आंधळगाव, ता. शिरूर) असं तळ्यात बुडून मृत्यू झालेल्या आहे. ही घटना दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साहेबराव पांढरे हे आपल्या चुलत भावांसोबत वड्याच्या तळ्याजवळ बकरी धुण्यासाठी गेले होते. दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास बकरी धुत असताना त्यांचा तोल जाऊन ते पाण्यात पडले. त्यांना पोहता येत नसल्याने ते पाण्यात बुडाले. त्यांच्या सोबत असलेल्या नातेवाईकांनी तत्काळ शोध घेण्याचा प्रयत्न केला.
मात्र, त्यांचा थांगपत्ता लागला नाही. त्यानंतर सतीश ठोंबरे यांना बोलावण्यात आले, त्यांनी पाण्यात बुडी मारून साहेबराव यांना बाहेर काढले. मात्र, त्यावेळी त्यांच्यात कोणतीही हालचाल नव्हती. त्यानंतर त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालय न्हावरा येथे दाखल करण्यात आले. मात्र, तपासणीअंती डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या घटनेबाबत साहेबराव यांचे चुलत भाऊ दादा सखाराम पांढरे यांनी मांडवगण फराटा पोलीस ठाण्यात खबर दिली. त्यांनी दिलेल्या जबाबानुसार, हा एक दुर्दैवी अपघात असून त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा संशय नाही. या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार खबाले करत आहे.





