Dhanush: ‘साई पल्लवीसारखी सीता संपूर्ण भारतात मिळणार नाही!’ धनुषने घेतली अभिनेत्रीची बाजू; टीकाकारांना दिले चोख उत्तर
Dhanush धनुष आणि साई पल्लवी लवकरच 'ओम' या चित्रपटातून पुन्हा एकत्र काम करताना दिसणार आहेत. जवळपास नऊ वर्षांनंतर ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यापूर्वी दोघांनी 'मारी 2' या चित्रपटात एकत्र काम केले होते.

Dhanush: रामायण चित्रपटातील सीतेच्या भूमिकेमुळे साई पल्लवी सध्या चर्चेत आहे. तिच्या निवडीवर सोशल मीडियातून टीका होत असताना अभिनेता धनुष तिच्या समर्थनार्थ पुढे आला आहे. साईच्या अभिनयासह तिच्या व्यक्तिमत्त्वाचेही त्याने कौतुक केले आहे.
नितेश तिवारी यांच्या आगामी ‘रामायण’ चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. या चित्रपटात अभिनेत्री साई पल्लवी माता सीतेची भूमिका साकारत आहे. मात्र, या भूमिकेसाठी साई पल्लवीची निवड झाल्यापासून सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. काही जण तिच्या निवडीवर प्रश्न उपस्थित करत आहेत, तर काही जण तिच्या समर्थनार्थ उभे राहत आहेत. आता अभिनेता धनुषनेही साई पल्लवीची बाजू घेत तिचे कौतुक केले आहे. विशेष म्हणजे, तिच्या सीतेच्या भूमिकेवर होणाऱ्या टीकेबाबतही त्याने आपले मत मांडले आहे.
काय म्हणाला धनुष?
धनुष आणि साई पल्लवी लवकरच ‘ओम’ या चित्रपटातून पुन्हा एकत्र काम करताना दिसणार आहेत. जवळपास नऊ वर्षांनंतर ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यापूर्वी दोघांनी ‘मारी 2’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. नुकत्याच झालेल्या ‘ओम’ चित्रपटाच्या प्री-रिलीज कार्यक्रमात धनुषने साई पल्लवीसोबत काम करण्याचा अनुभव सांगितला. यावेळी त्याने तिच्या स्वभावाचे आणि अभिनयाचे भरभरून कौतुक केले.
या कार्यक्रमातील धनुषचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये तो साई पल्लवीच्या सीतेच्या भूमिकेबाबत बोलताना दिसत आहे. साईच्या निवडीवर एवढी चर्चा का होत आहे, हेच आपल्याला समजत नसल्याचे त्याने सांगितले.
धनुष म्हणाला की, चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान शॉट्सच्या मधल्या वेळेतही साई पल्लवी सतत देवाची प्रार्थना करत असे. तिची देवावर असलेली श्रद्धा आणि तिचा स्वभाव पाहून तो प्रभावित झाला आहे. तो पुढे म्हणाला, “संपूर्ण भारतात शोधले तरी साई पल्लवीसारखी दुसरी सीता तुम्हाला मिळणार नाही. तिची देवावर खूप श्रद्धा आहे. ती मनाने अतिशय स्वच्छ आहे. ती सुंदर तर आहेच, पण एक उत्तम अभिनेत्रीही आहे.” धनुषच्या या विधानामुळे साई पल्लवीच्या समर्थनार्थ आणखी एक कलाकार पुढे आल्याचे पाहायला मिळत आहे.

Sai Pallavi
नऊ वर्षांत साई पल्लवीमध्ये झाला मोठा बदल
धनुषने यावेळी साई पल्लवीसोबतच्या पहिल्या भेटीची आठवणही सांगितली. ‘मारी 2’ चित्रपटाच्या वेळी साई पल्लवी खूप शांत आणि कमी बोलणारी होती. कोणतीही गोष्ट बोलण्यापूर्वी ती बराच विचार करायची. त्यामुळे सुरुवातीला तिच्याशी संवाद साधताना थोडा संकोच जाणवत असे, असे धनुषने सांगितले.
मात्र, तब्बल नऊ वर्षांनंतर ‘ओम’ चित्रपटाच्या सेटवर तिची पुन्हा भेट झाली, तेव्हा तिच्यात झालेला बदल पाहून धनुष आश्चर्यचकित झाला. आता ती अभिनयाच्या बाबतीत खूप प्रगल्भ झाली आहे. तिच्या बोलण्यात, चालण्यात आणि चेहऱ्यावरील हावभावांमध्ये आत्मविश्वास आणि एक वेगळाच ठहराव जाणवतो, असेही त्याने सांगितले.
‘ओम’मध्ये साकारणार सीबीआय अधिकाऱ्याची भूमिका
धनुष आणि साई पल्लवी ‘ओम’ या चित्रपटातून पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटात ममूटी यांचीही महत्त्वाची भूमिका आहे. साई पल्लवी या चित्रपटात नित्या रेड्डी नावाच्या सीबीआय अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. लाल चंदनाच्या अवैध तस्करी प्रकरणाचा तपास तिचे पात्र करताना दिसणार आहे. या आव्हानात्मक भूमिकेसाठी साईने घेतलेल्या मेहनतीचेही धनुषने कौतुक केले. ही भूमिका साकारणे सोपे नव्हते, मात्र साईने धैर्याने ती स्वीकारली आणि उत्तम अभिनय केला, असे त्याने म्हटले.
दरम्यान, ‘रामायण’ चित्रपटात रणबीर कपूर प्रभू श्रीराम, यश रावण, रवि दुबे लक्ष्मण आणि सनी देओल हनुमानाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाच्या पहिल्या भागाचे प्रदर्शन ५ नोव्हेंबरला झाले असून दुसरा भाग २०२८ मध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे साई पल्लवीच्या सीतेच्या भूमिकेबाबतची चर्चा आगामी काळातही कायम राहण्याची शक्यता आहे.




