Arbaz Shaikh : “असं सोडून जायचं नव्हतं…”; ‘सैराट’ फेम अरबाज शेखची भावूक पोस्ट, वडिलांसोबतचा ‘तो’ शेवटचा क्षण केला शेअर
Arbaz Shaikh : वडिलांचं छत्र हरपल्यानंतर अरबाजच्या कुटुंबावर मोठा आघात झाला आहे.

Arbaz Shaikh : ‘सैराट’ चित्रपटातून घराघरात पोहोचलेला अभिनेता अरबाज शेख याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अरबाजचे वडील अस्लम शेख यांचे उपचारादरम्यान निधन झाले. त्यांना ब्रेन हॅमरेज झाल्यानंतर गेल्या महिनाभरापासून त्यांच्यावर सोलापूरमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, काल त्यांची मृत्यूची झुंज अपयशी ठरली आणि त्यांची प्राणज्योत मालवली. वडिलांचं छत्र हरपल्यानंतर अरबाजच्या कुटुंबावर मोठा आघात झाला आहे.
वडिलांना वाचवण्यासाठी अरबाजने शक्य ते सर्व प्रयत्न केले होते. काही दिवसांपूर्वी त्याने सोशल मीडियावर एक भावनिक व्हिडीओ शेअर करत, “मला माझ्या वडिलांना काहीही करून वाचवायचं आहे, त्यांना गमवायचं नाही,” अशी आर्त हाक दिली होती. हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. अनेकांनी या व्हिडिओवर प्रतिक्रिया देत मदतीसाठी हात पुढे केले होते.
या व्हिडिओतून अरबाजने संबंधित रुग्णालयात औषधांच्या नावाखाली होत असलेल्या कथित गैरप्रकारांकडेही लक्ष वेधले होते. त्याच्या या आरोपांची दखल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच अन्न व औषध प्रशासनाने घेतली होती. मात्र, काही तासांतच अरबाजने तो व्हिडीओ हटवला आणि आपल्या कुटुंबाची व वडिलांची प्रकृती हीच सध्या प्राथमिकता असल्याचे स्पष्ट केले होते.
View this post on Instagram
अखेर उपचार सुरू असतानाच अस्लम शेख यांची प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे अरबाज आणि त्याच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. वडिलांच्या निधनानंतर अरबाजने सोशल मीडियावर पहिली पोस्ट शेअर केली आहे.
या पोस्टमध्ये त्याने वडिलांसोबतचा शेवटचा फोटो आणि रुग्णालयात त्यांचा हात आपल्या हातात घट्ट धरल्याचा हृदयस्पर्शी क्षण चाहत्यांसोबत शेअर केला आहे. या फोटोला कॅप्शन देताना अरबाजने केवळ एकच वाक्य लिहिले “असं सोडून जायचं नव्हतं…”. त्याची ही पोस्ट पाहून चाहत्यांसह अनेक कलाकारांनीही शोक व्यक्त केला आहे.





