Arbaz Shaikh : “माझ्या बापाला मला मरताना नाही पाहायचंय, मला मदत करा प्लीज”; ‘सैराट’ फेम अभिनेता ढसाढसा रडला, नेमकं काय घडलं?
Arbaz Shaikh : व्हिडिओमधून त्याने वडिलांच्या उपचारासाठी आर्थिक मदतीचे आवाहन केले असून, हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Arbaz Shaikh : ‘सैराट’ या गाजलेल्या मराठी चित्रपटातून घराघरात पोहोचलेला ‘सल्या’ म्हणजेच अभिनेता अरबाज शेख सध्या एका संकटाचा सामना करत आहे. त्याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला असून या व्हिडिओत तो रडताना दिसत आहे. व्हिडिओमधून त्याने वडिलांच्या उपचारासाठी आर्थिक मदतीचे आवाहन केले असून, हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्याच्यासोबत नेमकं काय घडलं आहे हे त्याने व्हिडिओमधून सांगितलं आहे.
व्हिडिओमध्ये अरबाज शेखने सांगितले की, त्याच्या वडिलांना ब्रेन हॅमरेज झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती अधिक बिघडल्याने त्यांना सोलापूरमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. संबंधित रुग्णालयात उपचारादरम्यान आलेल्या अनुभवाबाबत त्याने गंभीर आरोप रुग्णालयावर केले आहेत.
व्हिडिओमध्ये बोलताना अरबाजने दावा केला की, रुग्णालयात दाखल करताना सुरुवातीला ठेव रक्कम जमा करण्यास सांगण्यात आली. त्यानुसार त्याने १० हजार रुपये जमा केले. त्यानंतर आवश्यक औषधे आणि इंजेक्शन केवळ रुग्णालयातील मेडिकलमधूनच खरेदी करण्याचा आग्रह करण्यात आला.
View this post on Instagram
बाहेरून औषधे आणण्याची परवानगी नाकारण्यात आला असा आरोप त्याने केला आहे. त्याच्या म्हणण्यानुसार, रुग्णालयातील मेडिकलमधून घेतलेल्या औषधांवर ४० हजार रुपयांपेक्षा अधिक खर्च आला, तर तीच औषधे बाहेर कमी किमतीत उपलब्ध होती.
“एवढी लूट होतीय, माझ्या बापाला मला मरताना नाही पाहायचंय, म्हणून मला त्यांना नोबलमधून शिफ्ट करावं लागलं. मला खूपच इथे वाईट अनुभव आलाय, त्यामुळे ज्यांना माहीत आहे त्यांनी मला सांगावं की, मी कुठे ट्रिटमेंट केली पाहिजे? कशी ट्रिटमेंट केली पाहिजे मला आता काहीच कळत नाहीये, माझ्या वडिलांना मला वाचवायचंय काही करुन, मला मदत करा प्लीज…” असं म्हणताना अरबाजला अश्रू अनावर झाले.
त्याच्या या भावनिक व्हिडिओनंतर अनेक चाहत्यांनी सोशल मीडियावर त्याला धीर देत मदतीचा हात पुढे करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, अरबाज शेखने केलेल्या आरोपांवर सोलापूर येथील नोबल रुग्णालयाची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही.
हेही वाचा : Sangeeta Bijlani: सलमानसोबत लग्नपत्रिका छापल्या, पण लग्न मोडलं; तरीही संगीता बिजलानीची मैत्री आजही कायम



