“तुम्ही सरकारमध्ये असताना बंद करता, याची तुम्हाला लाज वाटायला पाहिजे”; ठाकरे गटाच्या ‘या’ नेत्याची सरकारवर टीका

मुंबई : राज्यपाल कोश्यारींसह भाजपा नेत्यांनी शिवरायांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानांविरोधात आज महाविकास आघाडीकडून महामोर्च्याचे आयोजन करण्यात आले आहे. तर मविआच्या मोर्च्याला प्रत्युत्तर म्हणून भाजपाच्यावतीने ‘माफी मांगो’ आंदोलन करण्यात येत आहे. त्याचबरोबर सुषमा अंधारेंविरोधात शिंदे गटाकडून ‘ठाणे बंद’ ठेवण्यात आले आहे. दरम्यान, यावरून उद्धव ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांनी तुम्ही सरकारमध्ये असताना बंद करता, याची तुम्हाला लाज वाटायला पाहिजे, असे म्हणत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
“महाविकास आघाडीचा महामोर्चा असल्याने मिंधे गटाच्या माध्यमातून ‘ठाणे बंद’ची हाक देण्यात आली आहे. आज संपूर्ण महाराष्ट्रातून कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले आहेत. राज्य सरकारनेही या महामोर्च्याला परवानगी दिली आहे, असे असताना ‘ठाणे बंद’ करण्याचा जो कुटील डाव त्यांनी केला आहे, हा ठाणेकरांचा अपमान आहे”, अशी संतप्त प्रतिक्रिया ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांनी दिली आहे.
पुढे बोलताना राजन विचारे यांनी,“तुम्ही सरकारमध्ये असताना बंद करता, याची तुम्हाला लाज वाटायला पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांचा राजीनामा घ्यायला पाहिजे”, असे म्हणत शिंदे गटावर निशाणा साधला आहे.
“ठाण्यात रात्रीपासून बसेस बंद करण्यात आल्या आहेत. रिक्षा बंद करण्याचा प्रयत्नदेखील करण्यात आला आहे. लोकांना वेठीस धरण्यात येत आहे. आज अनेक नागरिकांना पायी प्रवास करावा लागतो आहे. अनेक ठिकाणी दुकानंदेखील बंद करण्यात आली आहेत. एकीकडे सरकार आमच्या मोर्च्याला परवानगी देतं आणि दुसरीकडे ठाण्यातील लोकं मोर्च्यात सहभागी होऊ नये म्हणून बसेस बंद करण्यात येतात, हा दुटप्पीपणा आहे. येत्या निवडणुकीत जनता त्यांना धडा शिकवेल”, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.





