सिंधुदुर्ग : सिद्धिविनायक ऊर्फ प्रकाश बिडवलकर हत्या प्रकरणामुळे कोकणातील राजकारण पुन्हा तापले आहे. या प्रकरणात संशयाची सुई शिवसेना आमदार नीलेश राणेंवर रोखण्यात आली होती. राणेंचे कट्टर विरोधक आणि माजी आमदार वैभव नाईक यांनी आरोप केला होता. नाईक यांच्या आरोपांना नीलेश राणेंनी पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिले. वैभव नाईक यांना हे प्रकरण माहिती होतं तर त्यांनी ते का लपवलं ? २ वर्षांपूर्वी केस रजिस्टर का केली नाही? नाईक त्यावेळी आमदार होते. ते सरकार जाण्याची वाट पाहात होते का? असे प्रश्न राणे यांनी या पत्रकार परिषदेत विचारले. वैभव नाईकांनी हा व्हिडिओ पोलिसांना देत सोशल मीडियावर टाकला. त्यावर पोलिसांनी वैभव नाईक यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी देखील राणे यांनी यावेळी केली. सिद्धिविनायक ऊर्फ प्रकाश बिडवलकर या तरुणाचे मार्च २०२३ मध्ये अपहरण करण्यात आले होते. त्यावेळी त्याला विवस्त्र करून बेदम मारहाण करण्यात आले. या मारहाणीचे व्हिडिओ सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी व्हायरल झाले. या अपहरणानंतर गायब असलेल्या बिडवलकरची हत्या झाल्याचा उलगडा काही दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या एका निनावी फोनच्या माध्यमातून करण्यात आला. या हत्येमध्ये सिद्धेश शिरसाट, गणेश नार्वेकर, सर्वेश केरकर आणि अमोल शिरसाट यांचा समावेश आहे. पण त्यातल्या सिद्धेश शिरसाटचा दाखला देत, वैभव नाईक यांनी या हत्येमागे शिंदे गटातल्या एका नेत्याचं कनेक्शन असल्याचा आरोप केला. नाईकांनी हा इशारा नीलेश राणेंकडे केला होता. नीलेश राणे यांनी त्यावर पत्रकार परिषदेत हे आरोप फेटाळताना नव्याने वैभव नाईक यांच्यावर आरोप केले.