इस्लामपूर : सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे आज (16 ऑगस्ट) महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या प्रा. डॉ. एन. डी. पाटील विधी महाविद्यालय, श्रीमती सरोज नारायण पाटील (माई) मानसशास्त्र संशोधन केंद्र आणि प्रा. डॉ. एन. डी. पाटील बहुउद्देशीय सभागृहाच्या उद्घाटन सोहळ्यात अजित पवार आणि रोहित पवार यांच्यात शाब्दिक जुगलबंदी रंगली. आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांना “गावकीचा विचार करतात, पण भावकी विसरले” असा टोला लगावल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही हसत-हसत पलटवार केला. “भावकीमुळे तू आमदार झालास, माझ्या नादाला लागू नका,” असा सणसणीत इशारा त्यांनी रोहित पवारांना दिला. यावेळी राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही वाळवा तालुका सहजासहजी वाकत नाही, असे म्हणत अप्रत्यक्षपणे अजित पवारांना चिमटे काढले. रोहित पवारांचा टोला आणि अजित पवारांचा पलटवार रोहित पवार यांनी आपल्या भाषणात क्रिकेटच्या शैलीत नेत्यांची तुलना करत अजित पवारांना “यॉर्कर टाकणारे फास्ट बॉलर” संबोधले आणि “गावकीचा विचार करतात, पण भावकी विसरले” असा खोचक टोमणा मारला. यावर अजित पवारांनी व्यासपीठावर बोलताना रोहित पवारांचा चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले, “रोहित म्हणाला की दादांचे गावकीकडे लक्ष आहे, पण भावकीकडे नाही. मी सांगतो, भावकीकडे लक्ष दिलं म्हणूनच तू आमदार झालास. तू बॅलेट पेपरवर निवडून आलास, हे जयंत पाटील यांनी तुला सांगावं.” पुढे त्यांनी हसत-हसत इशारा देत म्हटले, “मी महायुतीत गेल्यापासून तुमच्या कुणावर टीका केली आहे का? तुम्ही तुमच्या विचाराने चालत आहात, मी माझ्या विचाराने चालतोय. पण माझ्या नादाला लागू नका!” जयंत पाटील यांच्यावरही कोपरखळी कार्यक्रमात जयंत पाटील यांनी वाळवा तालुका सहजासहजी वाकत नाही, असे वक्तव्य करत अजित पवारांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला. यावर अजित पवारांनीही मिश्कीलपणे प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, “जयंत पाटील यांचं देखणं व्यक्तिमत्त्व आणि प्रेमळ आवाज याबद्दल बोललं गेलं. मग आम्ही काय कमी देखणे आहोत का? वाळव्यात बोलवायचं आणि आमचीच बिन पाण्याने करायची!” या वक्तव्यानंतर उपस्थितांमध्ये हास्यकल्लोळ झाला. अजित पवारांनी पुढे सांगितले, “रोहितने मला सांगितलं की, आम्ही हेलिकॉप्टरने येऊ. मला वाटलं, माझं भाषण ऐकायला हे दोघेही नसतील. पण माझं नशीब की दोघेही इथे आहेत!”