Yogi Adityanath : दोन्ही राज्यांत योगींचा स्ट्राइक रेट चांगला; सभा घेतलेल्या जागांवर भाजपची सरशी

Jammu and Kashmir | Haryana | Election Results : हरियाणा आणि जम्मू काश्मीर या दोन्ही राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे फायरब्रँड नेते योगी आदित्यनाथ यांना नेते आणि कार्यकर्त्यांकडून प्रचंड मागणी होती. योगी यांनी 6 दिवसांत दोन्ही राज्यांमध्ये एकूण 19 विधानसभा निवडणूक सभा घेतल्या.
योगींनी ज्या ठिकाणी सभा घेतल्या होत्या, त्यापैकी जवळपास दोनतृतीयांश जागांवर भाजपची सरशी झाली आहे. जम्मूमधील छंब, रामगड, आरएस पुरा, रामनगर आणि कठुआ येथे योगी यांनी प्रचर केला होता.
यामध्ये छंबचा सुरूवातीचा अपवाद वगळता, रामगढ विधानसभा, आरएस पुरा विधानसभा, रामनगर विधानसभा आणि कठुआ विधानसभेत भाजपने आघाडी बाजी मारली.
हरियाणामध्ये योगींनी प्रचार केलेल्या 13 विधानसभा जागा आहेत, त्यापैकी भाजप 8 जागांवर विजयी ठरला. अन्य पाच जागा कॉंग्रेसच्या खात्यात गेल्या. नरवाना, राय, असंध, फरिदाबाद एनआयटी, रादौर, बावनी खेडा, हांसी विधानसभा आणि सफिडॉन येथे योगींच्या सभा झाल्या होत्या.
याखेरीज अटेली, जगाधरी विधानसभा, नारनौंद विधानसभा, शाहबाद विधानसभा आणि कलायत येथेही त्यांनी प्रचार केला होता. तेथे मात्र पक्षाला लाभ झालेला दिसत नाही.





