Satara | निरोगी आयुष्यासाठी योगासने आवश्यक – आ. गोरे

म्हसवड (प्रतिनिधी) – दररोज प्रत्येक व्यक्तीने आपल्या स्वतःसाठी काही वेळ योगासनांवर खर्च केलाच पाहिजे. तरच येणारी पिढी ही मानसिक आणि शारीरिक सशक्त होईल आणि ती आज काळाची गरज आहे, असे प्रतिपादन आमदार जयकुमार गोरे यांनी केले.
म्हसवड येथील मेरीमाता हायस्कूलमध्ये जिल्हास्तरीय योगासन स्पर्धा घेण्यात आल्या. यावेळी आमदार गोरे बोलत होते. यावेळी माजी नगराध्यक्ष विजय धट, जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन जी तारळकर, फादर सनु, लुनेश विरकर, बाळासाहेब पिसे, संग्राम शेटे, रवी पाटील, शिक्षक, पालक उपस्थित होते.
आमदार गोरे म्हणाले, मी सुध्दा एक खेळाडू राहिलो आहे. खेळांचे महत्त्व आपल्या जीवनामध्ये अनन्यसाधारण आहे. काहीही झालं तरी मी व्यायाम केल्याशिवाय घरातून बाहेर पडत नाही.
मेरीमाता हायस्कूल नेहमीच असे नवनवे उपक्रम राबवत असते हे निश्चितच कौतुकास्पद बाब आहे. यावेळी हायस्कूलमध्ये असणारया शूटिंग रेंज यामध्ये त्यांनी नेमबाजीचा देखील अनुभव घेतला. जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. अशोक हांडे यांनी सूत्रसंचालन केले. संजय शर्मा यांनी आभार मानले.





