Mhaswad Police : म्हसवड पोलिसांचा मोठा दणका! भरचौकात बुलेट थांबवून थेट काय केलं? वाचा सविस्तर
Mhaswad Police : सवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत विशेष नाकाबंदी अभियान; वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या ४० वाहनधारकांकडून २६ हजार रुपयांचा दंड वसूल.

Mhaswad Police – म्हसवड पोलीस ठाणे हद्दीत वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांविरोधात पोलिसांनी विशेष नाकाबंदी अभियान राबवत धडक कारवाई केली. या कारवाईत एकूण ४० वाहनधारकांवर कारवाई करून तब्बल २६ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या आदेशान्वये ही विशेष मोहीम राबविण्यात आली असून दारु पिऊन वाहन चालविणे, भरधाव वेग, विनानंबर प्लेट, फॅन्सी नंबर प्लेट, विनाहेल्मेट,
कर्णकर्कश आवाजाचे सायलन्सर तसेच काळ्या काचा असलेल्या वाहनांची कसून तपासणी करण्यात आली. या नाकाबंदी दरम्यान वाहतुकीचे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांविरोधात मोटार वाहन अधिनियमांतर्गत दंडात्मक कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे कर्णकर्कश आवाज करणारे सायलन्सर बसवून वाहन चालविणाऱ्या तीन बुलेटचे सायलन्सर काढून त्यांच्यावर दंड आकारण्यात आला.
कारवाईदरम्यान म्हसवड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप पोमण उपस्थित होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोपट चव्हाण, रणजित खाडे, महावीर कोकरे, श्रीकांत सुद्रिक, युवराज खाडे व वसीम मुलाणी या पोलिस कर्मचाऱ्यांनी नाकाबंदी दरम्यान वाहनांची तपासणी केली. वाहतुकीचे नियम पाळून वाहन चालवावे, हेल्मेटचा वापर करावा तसेच ध्वनीप्रदूषण करणाऱ्या वाहनांपासून दूर राहवे, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे. भविष्यातही अशाच प्रकारच्या कडक कारवाया सुरु राहणार असल्याचा इशारा संदीप पोमण यांनी दिला.





