…होय, करोना अॅक्टिव्हच्या आकडेवारीत तफावत

विभागीय आयुक्तांची कबुली : मानवी चुका, खासगी प्रयोगशाळांवर ठपका
पुणे – करोनाच्या अॅक्टिव्ह बाधितांच्या दैनंदिन अहवालाची माहिती महापालिका भरताना प्रयोगशाळांकडून दूरध्वनीवरून घेतली जाते. त्याचबरोबर इतर जिल्ह्यांतून उपचारांसाठी शहरात आलेल्या रुग्णांची अनेकदा माहिती दिली जात नाही. यामुळे महापालिका आणि जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडून देण्यात येणाऱ्या दैनंदिन करोना अहवालात मोठ्या प्रमाणात तफावत आढळत असल्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी स्पष्ट केले.
मागील काही दिवसांपासून शहरातील करोना अॅक्टिव्ह बाधितांच्या माहितीमध्ये मोठी तफावत असल्याचे दिसून येत आहे. याबाबत प्रशासनाकडून पहिल्यांदाच कबुली देण्यात आली. खासगी प्रयोगशाळांकडून उशिराने दिली जाणारी माहिती, प्रयोगशाळांकडून दूरध्वनीवरुन माहिती घेण्यात येत असल्याने होणाऱ्या मानवी चुका, रुग्णांची माहितीची डेटा एन्ट्री करताना होणारी गडबड, अशा कारणांमुळे यामध्ये तफावत येत असल्याचे राव यांनी सांगितले. खासगी प्रयोगशाळांकडून सकारात्मक रुग्णांची माहिती उशिरा कळवली जाते.
राज्याच्या आरोग्य खात्याच्या एकात्मिक रोग सर्वेक्षण प्रकल्पांद्वारे (आयडीएसपी) करोना रुग्णांची माहिती संकलित करण्यात येते. “आयडीएसपी’कडून पुणे शहराची दिली जाणारी माहिती आणि पुणे महापालिकेकडून दिली जाणाऱ्या अहवालात तफावत येत होती. त्यावर खासगी रुग्णालयांकडून उपचाराअंती बरे होऊन घरी सोडलेल्या रुग्णांची माहिती ई-सूचनाफलकावर (डॅशबोर्ड) अद्यायावत करण्यात येत नसल्याने तफावत येत असल्याचे सांगण्यात आले.





