Yerwada Murder Case – येरवड्यात दारू पिताना झालेल्या वादातून एकाने आपल्या मित्राचा खून केला. माशाक गाझीबक्ष विजापुरे ( ४०, रा. येरवडा) याचा खून झाला असून याप्रकरणी गणेश वसंत शिंदे याला अटक झाली आहे.माशाक आणि गणेश मित्र आहेत. दाेघेजण शनिवारी दुपारी कामराजनगर परिसरात दारू पित होते. यावेळी किरकोळ कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. माशाकने गणेश याला शिवीगाळ केली. गणेशने शेजारी पडलेले दांडके उचलून माशाकच्या डोक्यात घातले. माशाकच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन तो बेशुद्ध पडला. गणेशने त्याला शुद्धीत आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने प्रतिसाद न दिल्याने गणेश घाबरला आणि पसार झाला. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र कदम यांनी घटनास्थळी भेट दिली. माशाकला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. पसार आरोपी गणेश याला पोलिसांनी सायंकाळी अटक केली.