Pune Traffic Police : बेशिस्तांना पोलिसांनी दिले शिस्तीचे धडे; अडीच हजार दुचाकीस्वारांंनी भरला २९ लाखांचा दंड
Pune Traffic Police : बेशिस्त दुचाकीस्वारांमुळे होणारे अपघात रोखण्यासाठी वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला.

Pune Traffic Police – बेशिस्त दुचाकीस्वारांमुळे होणारे अपघात रोखण्यासाठी वाहतूक पोलिसांनी मंगळवारी (दि.१०) कारवाईचा बडगा उगारला. विरुद्ध दिशेने जाणारे, ट्रिपल सीट असे नियमभंग करणाऱ्या अडीच हजार दुचाकीस्वारांविरुद्ध कारवाई केली. वाहतूक शाखेसह स्थानिक पोलीस ठाण्यातील पथके या कारवाईत सहभागी झाली होती. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती. दिवसभरात अडीच हजार दुचाकीस्वारांविरुद्ध कारवाई केली असून,
त्यांच्याकडून २९ लाख ३८ हजार ४५० रुपये दंड वसूल केल्याची अशी माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी दिली.पोलिसांनी वेगवेगळ्या भागात कारवाई करुन दुचाकी जप्त केल्या. दुचाकीच्या कागदपत्रांची पूर्तता, तसेच थकीत दंड वसूल केल्यानंतर दुचाकी ताब्यात देण्यात आल्या. कारवाईमुळे दुचाकीस्वारांना नियमभंगाच्या परिणामांची जाणीव झाली. कर्णकर्कश हाॅर्न, सायलेन्सरमध्ये फेरफार करुन विक्री करणाऱ्या वारजे भागातील दुकानदारांविरुद्ध कारवाई केल्याचे पाटील यांनी नमूद केले.
भरधाव दुचाकी चालविणे, एकाच दुचाकीवरुन तिघांचा प्रवास (ट्रिपल सीट), विरुद्ध दिशेने जाणे (राँग साईड) अशा प्रकारचे नियमभंग करण्याचे प्रकार वाढले आहे. बेशिस्त दुचाकीस्वारांमुळे गंभीर अपघात घडतात. भरधाव दुचाकीस्वार पादचाऱ्यांना धडक देऊन पसार झाल्याच्या घटना घडल्या आहे. दुचाकीस्वार स्वत:चा जीव धोक्यात घालतात, तसेच समोरुन येणाऱ्या वाहनचालकांना हूल देतात. त्यामुळे गंभीर अपघात घडतात.
बेशिस्त वाहन चालकांचे बुधवारी शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात समुपदेशन करण्यात आले. समुपदेशनाच्या माध्यमातून वाहतूक पोलिसांनी दुचाकीस्वारांना शिस्तीचे धडे दिले. समुपदेशन कार्यक्रमात ४५० ते ५०० दुचाकीस्वार सहभागी झाले होते. वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांच्यासह वाहतूक शाखेतील अधिकारी या वेळी उपस्थित होते.
“बेशिस्त दुचाकीस्वारांविरुद्ध यापुढील काळात अचानक कारवाई करण्यात येणार आहेत. पोलिसांनी मंगळवारी दिवसभरात अडीच हजार दुचाकी ताब्यात घेतल्या. थकीत वाहतूक दंड, दुचाकी वाहनांच्या कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर दुचाकी टप्याटप्याने परत केल्या जाणार आहेत.”
– मनोज पाटील, अतिरिक्त पोलीस आयुक्त





