Nagar | दोन दिवस जिल्ह्यासाठी पावसाचा यलो अलर्ट

नगर, (प्रतिनिधी) – जिल्ह्याच्या काही भागात आज ते २५ सप्टेंबर दरम्यान विजांच्या कडकडाटांसह पाऊस होण्याचा अंदाज आहे. त्यानंतर दोन दिवस हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. जिल्ह्यासाठी पिवळा इशारा (यलो अलर्ट) जारी करण्यात आलेला आहे.
पुणे, नाशिक व अहमदनगर जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्यास जिल्ह्यातील भिमा व घोड नदी, गोदावरी नदी तसेच प्रवरा व मुळा या नद्यांवरील धरणातून सोडलेल्या विसर्गामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होऊ शकते.
त्यामुळे जिल्ह्यातील भिमा, घोड, गोदावरी, प्रवरा व मुळा या नदीकाठावरील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. स्थानिक प्रशासनाद्वारे दिलेल्या सुचनांचे नागरिकांनी पालन करावे.
सखल भागात राहणाऱ्या नागरीकांना तातडीने सुरक्षितस्थळी स्थलांतर करावे. नदी, ओढे व नाल्याकाठच्या नागरिकांनी दक्ष रहावे. पाणीपातळीत वाढ होत असल्यास नागरिकांनी नदीपात्रातून तसेच ओढे व नाले यापासून दूर रहावे, सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे.
नदी अथवा ओढे नाल्यांवरील पुलावरुन पाणी वाहत असल्यास पुल ओलांडू नये. पूर पाहण्यासाठी गर्दी करू नये. आपत्कालीन परिस्थितीत जवळचे तहसील कार्यालय, पोलीस ठाणे किंवा जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथील दूरध्वनी क्र. १०७७ (टोल फ्री), क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.





