मराठवाडा पुन्हा बेदखल.! मंत्रिमंडळाची बैठक सलग दुस-या वर्षी रद्द

मुंबई : मराठवाड्यातील विकासाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी दरवर्षी संभाजीनगरात राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेण्याचे ठरवण्यात आले. मात्र या बैठकीत सलग दुस-या वर्षी खंड पडला आहे. हैदराबाद मुक्तिदिनाला केवळ ६ दिवस शिल्लक असून या कालावधीत बैठकीची तयारी होऊ शकत नसल्याचे प्रशासनातील उच्चपदस्थ अधिका-यांनी सांगितले. यावरून मराठवाडा सातत्याने दुर्लक्षित होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
विशेष म्हणजे, गेल्या २० वर्षांत संभाजीनगरमध्ये मंत्रिमंडळाच्या केवळ ६ बैठका घेतल्या. त्यात ४ बैठक तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी घेतल्या होत्या. १९७० च्या दशकात मराठवाडा विकास आंदोलनाचा आगडोंब उसळला. त्यानंतर १९८१ पासून सरकारने मराठवाड्यासाठी छत्रपती संभाजीनगर शहरात मंत्रिमंडळ बैठकीचे आयोजन करण्यास सुरुवात केली.
या माध्यमातून विभागातील विकासाच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याचा सरकारकडून प्रयत्न केला जाऊ लागला. तत्कालीन मुख्यमंत्री ए. आर. अंतुले यांनी १९८१ मध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये राज्य मंत्रिमंडळाची बैठक आयोजित केली. त्यानंतरच्या मुख्यमंत्र्यांनी ही परंपरा कायम ठेवली. १९९५ मध्ये राज्याच्या सत्तेत आलेल्या शिवसेना, भाजप युती सरकारच्या काळातही संभाजीनगरमध्ये मंत्रिमंडळाच्या बैठका झाल्या.
१९९९ मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार सत्तेत आले. विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखालील सरकार संभाजीनगरमध्ये आले. त्यानंतर सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री असताना राज्यात दुष्काळी स्थिती होती. त्यामुळे मंत्रिमंडळ बैठक झाली नाही. पुढे या बैठकांमध्ये सातत्याने खंड पडत गेला. विलासराव देशमुख दुस-यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतरही विभागात मंत्रिमंडळ बैठका घेण्यात आल्या.
त्या वेळी मंत्रिमंडळ बैठकीची कोणतीही निश्चित तारीख नव्हती. त्यामुळे विभागात मंत्रिमंडळाची बैठक घ्या, अशा मागण्या सरकारकडे केल्या जात असत. त्यातून मार्ग काढण्यासाठी देशमुख यांनी हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनाला जोडून मंत्रिमंडळाची बैठक छत्रपती संभाजीनगरमध्ये घेण्याची परंपरा सुरू केली होती.





