Year Ender 2024: सरलेले वर्ष म्युच्युअल फंड उद्योगासाठी ठरले नफादायक; मालमत्ता 68 लाख कोटींवर

मुंबई – सरलेले 2024 हे वर्ष म्युच्युअल फंड उद्योगासाठी कमालीचे नफादायक ठरले आहे. या वर्षात म्युच्युअल फंडात झालेली गुंतवणूक 17 लाख कोटी रुपयांनी वाढून म्युच्युअल फंडाच्या व्यवस्थापनाखालील मालमत्ता तब्बल 68 लाख कोटी रुपयांवर गेली आहे.
सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजे एसआयपीची लोकप्रियता मोठ्या शहराबरोबरच आता छोट्या शहरापर्यंत वाढली आहे.
अशा परिस्थितीत म्युच्युअल फंडातील किरकोळ गुंतवणूक वाढत राहण्याची शक्यता या क्षेत्रातील जाणकारांना वाटते. या वर्षात तब्बल 5.6 कोटी नवी म्युच्युअल फंड खाती उघडण्यात आली. एसआयपीच्या माध्यमातून 2.4 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक झाली.
2023 मध्ये म्युच्युअल फंडाच्या व्यवस्थापना खालील मालमत्ता 50.78 लाख कोटी रुपये होती. 2024 मध्ये यात तब्बल 33% वाढ होऊन 68 लाख कोटी रुपये झाली आहे. ही आकडेवारी फक्त नोव्हेंबरपर्यंतची आहे. डिसेंबरची आकडेवारी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात उपलब्ध होईल. हा उद्योग वेगाने वाढत आहे. गेल्या चार वर्षात म्युच्युअल फंडाच्या व्यवस्थापना खालील मालमत्ता तब्बल 30 लाख कोटी रुपयांनी वाढली आहे.
2024 या वर्षाचे आणखी एक महत्त्व म्हणजे गेल्या 14 वर्षापासून म्युच्युअल फंडातील गुंतवणूक सकारात्मक आहे. त्या अगोदर दोन वर्ष म्युच्युअल फंडातून गुंतवणूक काढून घेतली जात होती. देशात सध्या 45 म्युच्युअल फंड कंपन्या आहेत. म्युच्युअल फंडातील तेजीबाबत विश्लेषकांनी सांगितले की, सरलेल्या वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यांमध्ये भारतीय शेअर बाजारात कमालीची तेजी होती.
म्युच्युअल फंड उद्योगाने आणि इतर संस्थांनी म्युच्युअल फंडाबाबत सकारात्मक वातावरण निर्मिती केली आहे. आपल्या गुंतवणुकीवर खात्रीने अधिक परतावा मिळावा या दृष्टिकोनातून गुंतवणूकदार म्युच्युअल फंडाचा आधार घेत आहेत.
गुंतवणूकदारांचा विश्वास कायम –
यामुळे मध्यंतरीच्या काळामध्ये जरी शेअर निर्देशांक अस्थिर राहिले तरी गुंतवणूकदारांचा म्युच्युअल फंडावरील विश्वास कायम राहण्यास मदत मिळाली आहे. दरम्यान एकीकडे म्युच्युअल फंडातील गुंतवणूक वाढत असतानाच बँकासमोर मात्र ठेवी आकर्षित करण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यातून मार्ग काढण्याची विनंती बँकिंग क्षेत्राने अर्थ मंत्रालयाला अनेक वेळा केली आहे.





