बाजारात पडझड, मात्र म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणुकीचा ओघ कायम; SIP च्या माध्यमातून 26 हजार कोटींची गुंतवणूक

Mutual Fund SIP Investment: शेअर मार्केटमध्ये नववर्षाच्या सुरुवातीपासूनच चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्याकाही दिवसांपासून मार्केटमध्ये मोठी घसरण झाली आहे. मात्र, असे असतानाही म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याचा कल वाढल्याचे दिसून आले आहे. सिस्टॅमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनच्या (SIP) माध्यमातून करण्यात आलेली गुंतवणूक सर्वोच्च पातळीवर पोहोचली आहे.
डिसेंबर 2024 मध्ये म्युच्युअल फंडमध्ये एसआयपीच्या माध्यमातून करण्यात आलेल्या गुंतवणुकीचा आकडा 26,459 कोटी रुपयांवर पोहोचला. ही आतापर्यंतची सर्वात उच्चांक पातळी आहे. नोव्हेंबरमध्ये हाच आकडा 25,320 कोटी रुपये होता. इक्विटी म्युच्युअल फंडमधील गुंतवणुकीमध्ये दरमहिन्याला 15 टक्के वाढी पाहायला मिळत असून, डिसेंबर 2024 मध्ये एकूण गुंतवणूक तब्बल 41,115 कोटी रुपये होती.
एकीकडे परकीय गुंतवणुकदार भारतीय बाजारातून मोठ्या प्रमाणात पैसा काढून घेत आहेत. तर दुसरीकडे एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणुकीचा ओघ वाढत चालला आहे. नोव्हेंबर 2024 च्या तुलनेत डिसेंबर 2024 मध्ये एसआयपीद्वारे म्युच्युअल फंडमध्ये केलेली गुंतवणूक 1139 कोटी रुपये जास्त होती.
मिड कॅप-म्युच्युअल फंड योजनेत गुंतवणूक करण्याचा कल सर्वाधिक आहे. यामध्ये डिसेंबर महिन्यात सर्वाधिक 5093 कोटी रुपये गुंतवणूक झाली. तर लार्ज कॅपमध्ये 2010 कोटी रुपये गुंतवणूक करण्यात आली आहे. स्मॉल कॅप म्युच्युअल फंड्समधील गुंतवणुकीचा आकडा 4667 कोटी रुपये आहे.
एसआयपी खात्यांच्या संख्या देखील प्रचंड वाढल्याचे पाहायला मिळत आहे. डिसेंबर 2024 मध्ये एसआयपी खात्यांची संख्या 10,32,02,796 एवढी होती. तर नोव्हेंबर 2024 मध्ये हा आकडा 10,22,66,590 होता. त्यामुळे किरकोळ गुतंवणुकदार एसआयपीकडे वळत असल्याचे दिसून येत आहे.





