Mutual Fund : इक्विटी म्युच्युअल फंडामध्ये जानेवारी महिन्यात 39,688 कोटी रुपयांची गुंतवणूक

नवी दिल्ली – ऑक्टोबर महिन्यापासून शेअर बाजारात कमालीची अस्थिरता आहे. मुख्य निर्देशांकाबरोबर स्मॉल कॅप व मिडकॅप मोठ्या प्रमाणात कमी झालेले आहेत. ही अस्थिरता कधी संपुष्टात येणार याचा अंदाज लागणे शक्य होत नाही. मात्र अशा परिस्थितीतही गुंतवणूकदारांनी शेअर संदर्भातील म्हणजेच इक्विटी म्युचल फंडामध्ये जानेवारी महिन्यात 39,688 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.
प्राप्त आकडेवारीनुसार स्मॉल कॅप संबंधातील म्युच्युअल फंड आणि फ्लेक्सि कॅपसंदर्भातील म्युच्युअल फंडात जास्त गुंतवणूक झाली आहे. मात्र डिसेंबर महिन्याच्या तुलनेत जानेवारी महिन्यात इक्विटी म्युच्युअल फंडात झालेली गुंतवणूक साडेतीन टक्क्यांनी कमी आहे. डिसेंबर महिन्यामध्ये इक्विटी म्युचल फंडात 41,156 कोटी रुपयांचे गुंतवणूक झाली होती.
जानेवारीमहिन्यात एसआयपीच्या माध्यमातून झालेली गुंतवणूक किंचित कमी होऊन 26,400 कोटी रुपये झाली आहे. जी की डिसेंबर महिन्यामध्ये 26,459 कोटी रुपये होती. सध्या एसआयपी अंतर्गत व्यवस्थापनाखाली असलेली मालमत्ता 13.2 लाख कोटी रुपयांवर गेली आहे.
जानेवारी महिन्यात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 1.28 टक्क्याने कमी झाला. त्याचा काही परिणाम इक्विटी म्युच्युअल फंडावर झाला आहे. विशेष म्हणजे अस्थिर वातावरणातही म्युच्युअल फंडाची नवीन 30.7 लाख नवी खाती उघडण्यात आली. आयटीआय म्युच्युअल फंडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जतिंदरपाल सिंह म्हणाले की, जागतिक बाजारात कमालीची अस्थिरता आहे. त्याचबरोबर अर्थव्यवस्था कमकुवत झाली आहे. अशा परिस्थितीत या क्षेत्रावर थोडाफार परिणाम झाला आहे. त्यामुळे इक्विटी म्युच्युअल फंडाअंतर्गत असलेली मालमत्ता जानेवारी महिन्यात 4 टक्क्यांनी कमी होऊन 29.46 लाख कोटी रुपये झाली आहे. डिसेंबर महिन्यात ही रक्कम 30.57 लाख कोटी रुपये होती.
मोठ्या कंपन्यांपेक्षा छोट्या कंपन्यांच्या शेअरच्या भावावर आधारित जास्त गुंतवणूक केल्यामुळे गेल्या काही वर्षात गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळाला आहे. सध्या छोट्या कंपन्यांच्या शेअरचे भाव जास्त आहेत असे समजले जात असले तरी गुंतवणूकदारांचा छोट्या कंपन्यांच्या शेअरच्या भावावर आधारित म्युच्युअल फंडाकडे ओढा कायम असल्याचे दिसून येते. म्युच्युअल फंडाच्या आखत्यारीतील मालमत्ता आता वाढून 67.25 लाख कोटी रुपये झाली आहे. जी की डिसेंबर महिन्यात 66.93 लाख कोटी रुपये होती.
अस्थिर परिस्थितीतही एसआयपीमधील गुंतवणुकीवर फारसा परिणाम झालेला नाही. अस्थिर परिस्थितीत एसआयपीमध्ये गुंतवणूक चालू ठेवणे सर्वसामान्य गुंतवणूकदारांसाठी हितावह आहे. यासंदर्भात आम्ही वातावरण निर्मिती करणार आहोत.
– व्यंकट छलसानी, मुख्य कार्यकारी अधिकारी, अॅम्फी





