Marine Drive accident : मरीन ड्राइव्हवर काळाचा घाला! ट्रेलरला कारची जोरदार धडक, मंत्र्याच्या मुलीसह चौघांचा मृत्यू
Marine Drive accident : झारखंडमधील जमशेदपूरच्या मरिन ड्राइव्हवर गुरुवारी पहाटे भीषण अपघात झाला. सोनारी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मरीन ड्राइव्हवर भरधाव कार रस्त्यावर बंद पडलेल्या ट्रेलरच्या मागील बाजूला जाऊन आदळली.

Marine Drive accident : झारखंडमधील जमशेदपूरच्या मरिन ड्राइव्हवर गुरुवारी पहाटे भीषण अपघात झाला. सोनारी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मरीन ड्राइव्हवर भरधाव कार रस्त्यावर बंद पडलेल्या ट्रेलरच्या मागील बाजूला जाऊन आदळली.
या भीषण अपघातात कारमधील चार जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये झारखंडच्या मंत्री दीपिका पांडे सिंह यांच्या मुलीचा तृषा सिंह हिचाही समावेश असल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित ट्रेलर बुधवारी रात्री सुमारे १० वाजता बिघाडामुळे रस्त्यावर उभा होता. गुरुवारी पहाटे सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास भरधाव कार ट्रेलरच्या मागील बाजूला धडकली. धडक एवढी जोरदार होती की कार ट्रेलरमध्ये अक्षरशः अडकली आणि तिचा चक्काचूर झाला.
अपघाताची माहिती मिळताच डीएसपी सीसीआर मनोज ठाकुर, सोनारी पोलीस ठाण्याचे प्रभारी संजय सुमन यांच्यासह पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. कारमध्ये मृतदेह अडकल्याने बचाव पथकाला मोठी कसरत करावी लागली.
अखेर गॅस कटरच्या मदतीने कार कापून मृतदेह बाहेर काढण्यात आले. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी एमजीएम मेडिकल कॉलेज रुग्णालयात पाठवण्यात आले.
पोलिसांनी मृतांची ओळख सार्थक अग्रवाल, नमन गुप्ता, वंशिका खंडेलवाल आणि तृषा सिंह अशी केली आहे. प्राथमिक तपासात कारचा वेग अधिक असणे आणि पहाटेच्या अंधारात रस्त्यावर उभा असलेला ट्रेलर वेळेत न दिसणे ही संभाव्य कारणे समोर आली आहेत. मात्र, अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.




