Pakistan Cricket : न्यूझीलंड दौऱ्यासाठी PCB नं ‘यासिर अराफत’वर सोपवली मोठी जबाबदारी…

कराची – माजी क्रिकेटपटू यासिर अराफत यांची पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) संघाच्या उच्च कामगिरी प्रशिक्षकपदी (High-performance coach) नियुक्ती केली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या 5 टी-20 सामन्यांच्या मालिकेत अराफत संघासोबत असणार आहे. संघाचे उच्च परफॉर्मंस कोच सायमन हेलमोट हे वैयक्तिक कारणांमुळे न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार नाहीत. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी त्यांची उच्च कामगिरी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
– न्यूझीलंड दौऱ्यासाठी जबाबदारी सोपवली
– येत्या 12 जानेवारीपासून दौऱ्याला सुरवात
यापूर्वी, एकदिवसीय विश्वकरंडकानंतर, मोहम्मद हाफीजची पाकिस्तान संघाचे संचालक मिकी आर्थर यांच्या जागी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दौऱ्यासाठी संघ संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. ग्रँट ब्रॅडबर्नच्या जागी सायमन हेलमोटची उच्च परफॉर्मंस कोच म्हणून नियुक्ती करण्यात आली. एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेत पाकिस्तानला उपांत्य फेरी गाठता आलेली नाही. उमर गुलला वेगवान गोलंदाजी प्रशिक्षक, सईद अजमलला फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक आणि ॲडम हॉलिओकेला फलंदाजी प्रशिक्षक म्हणून घोषित करण्यात आले.
पाकिस्तानचा संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. भारतीय संघ 26 डिसेंबरपासून मेलबर्नमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसरा कसोटी सामना खेळणार आहे. तर पाकिस्तानी संघाला सिडनीमध्ये 3 जानेवारीपासून मालिकेतील शेवटचा सामना खेळायचा आहे. पर्थ येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात पाकिस्तानला 360 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता.
अराफत यांना न्यूझीलंड, इंग्लंडमध्ये प्रशिक्षकपदाचा अनुभव…
अराफत यांना न्यूझीलंड तसेच इंग्लंडमध्ये प्रशिक्षकपदाचा अनुभव आहे. त्याने पाकिस्तानसाठी १३ टी-२० सामन्यांसह २७ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. २००९ मध्ये टी-२० विश्वकरंडक जिंकणाऱ्या पाकिस्तानी संघाचाही तो भाग होता. मात्र, त्याला या स्पर्धेत केवळ एकच सामना खेळण्याची संधी मिळाली.





