यशवंत सिन्हा स्थापन करणार राजकीय पक्ष? झारखंडमध्ये भाजपची डोकेदुखी वाढण्याची शक्यता

हजारीबाग : माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांनी नवा राजकीय पक्ष स्थापन करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यांची योजना प्रत्यक्षात आल्यास झारखंडमध्ये आणखी एका पक्षाची भर पडू शकते. ती घडामोड प्रामुख्याने भाजपची डोकेदुखी वाढवणारी ठरू शकते. झारखंडच्या हजारीबागमध्ये ८६ वर्षीय सिन्हा यांनी रविवारी सायंकाळी समर्थकांची बैठक घेतली. त्यामध्ये नवा पक्ष स्थापण्याच्या प्रस्तावावर चर्चा झाली.
त्यानंतर सोमवारी दिल्लीला रवाना होण्याआधी सिन्हा यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी समाजाच्या विविध घटकांशी सल्लामसलत केल्यानंतर पक्ष स्थापनेविषयी अंतिम निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केले. मात्र, पक्ष स्थापनेचा त्यांचा निर्णय जवळपास निश्चित असल्याचे संकेत मिळत आहेत. समर्थकांच्या बैठकीत त्यांनी अटल विचार मंच असे पक्षाचे नावही सुचवले. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या विचारांनुसार नव्या पक्षाचे कामकाज चालेल असेही त्यांनी नमूद केले.
झारखंड राज्यात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणूक अपेक्षित आहे. ती निवडणूक तोंडावर असतानाच सिन्हा यांनी पक्ष स्थापनेच्या हालचाली सुरू केल्या आहेत. सिन्हा आणि त्यांचे पुत्र जयंत सिन्हा यांनी प्रदीर्घ काळ भाजपमध्ये कार्य केले. सिन्हा वाजपेयी सरकारमध्ये मंत्री होते. सिन्हा पिता-पुत्रांनी अनेकवेळा लोकसभेत हजारीबाग मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. त्यामुळे त्यांचा हजारीबाग आणि परिसरात प्रभाव आहे.
सिन्हा मागील काही वर्षांपासून भाजपपासून दुरावले. केंद्रातील मोदी सरकारवर ते जाहीर टीका करत होते. अखेर भाजपशी फारकत झाल्याने त्यांनी तृणमूल कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतरही त्यांचे पुत्र भाजपचे खासदार होते. मात्र, यावेळच्या लोकसभा निवडणुकीत भाजपने त्यांच्या जागी दुसरा उमेदवार दिला. त्यामुळे सिन्हा पिता-पुत्रांच्या भाजपवरील नाराजीत आणखीच वाढ झाल्याचे मानले जाते. सिन्हा यांनी नवा पक्ष स्थापन केल्यास भाजपच्या मतांमध्ये विभाजन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.





