IND vs WI : दिल्लीत यशस्वीचा जलवा, संयमी फलंदाजीने शतक ठोकत विराटच्या खास विक्रमाला दिली टक्कर!

Yashasvi Jaiswal equal Virat Kohli record : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दिल्लीत सुरू असलेल्या कसोटी सामन्यात यशस्वी जैस्वालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीचा जलवा दाखवला. जेव्हा तो आपल्या लयीत असतो, तेव्हा त्याला रोखणे कोणत्याही गोलंदाजासाठी आव्हानात्मक ठरते. यशस्वीने या सामन्यात प्रथम अर्धशतक, त्यानंतर शतक आणि काही वेळातच १५० धावांचा टप्पा गाठला. यासह त्याने एक खास पराक्रम केला.
यशस्वीने विराटच्या विक्रमाशी केली बरोबरी –
विशेष म्हणजे, कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी १५० पेक्षा जास्त धावा करण्याचा पराक्रम त्याने दुसऱ्यांदा केला आहे. यापूर्वी भारतासाठी हा पराक्रम फक्त विराट कोहलीनेच केला होता. या सामन्यात यशस्वी जैस्वालचा जोडीदार सलामीवीर केएल राहुल लवकर बाद झाला. मात्र, यशस्वीने एका बाजूने खिंड लढवत ठेवली. सुरुवातीला साई सुदर्शनने त्याला साथ दिली, आणि नंतर सुदर्शन बाद झाल्यावर कर्णधार शुबमन गिलने यशस्वीला उत्तम साथ दिली.
जैस्वालने संयमी फलंदाजी करत ठोकले शतक –
Piling on the runs! 🔝
1️⃣5️⃣0️⃣ up for Yashasvi Jaiswal 👏#TeamIndia inch closer to 300 runs with captain Shubman Gill joining him 👍
Updates ▶ https://t.co/GYLslRzj4G#INDvWI | @IDFCFIRSTBank | @ybj_19 | @ShubmanGill pic.twitter.com/4UPrcRASe2
— BCCI (@BCCI) October 10, 2025
यशस्वी जैस्वालने १५० धावा फक्त २२४ चेंडूत पूर्ण केल्या. यात त्याने १९ चौकार ठोकले. विशेष बाब म्हणजे, १५० धावा करेपर्यंत त्याने एकही षटकार लगावला नाही, ज्यावरून त्याच्या संयमी आणि तांत्रिक फलंदाजीचा अंदाज येतो. यापूर्वी २०२४ मध्ये इंग्लंडविरुद्ध विशाखापट्टणम येथे खेळताना यशस्वीने पहिल्याच दिवशी १७९ धावांची खणखणीत खेळी केली होती. कसोटीच्या पहिल्याच दिवशी १५० पेक्षा जास्त धावा करण्याचा पराक्रम भारतासाठी यापूर्वी फक्त विराट कोहलीनेच केला आहे.
हेही वाचा – Suryakumar Yadav : सूर्यकुमारला संघातून डच्चू! ‘या’ अष्टपैलू खेळाडूकडे सोपवली संघाची धुरा
कोहलीने कधी केला होता हा पराक्रम?
विराट कोहलीने २०१६ मध्ये इंग्लंडविरुद्ध विशाखापट्टणम येथे १५१ धावा आणि २०१७ मध्ये दिल्लीत श्रीलंकेविरुद्ध १५६ धावा कसोटीच्या पहिल्याच दिवशी केल्या होत्या. मात्र, यशस्वी सलामीवीर म्हणून खेळतो, तर कोहली सहसा चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करतो. त्यामुळे धावांमधील फरक स्वाभाविक आहे. आता सर्वांचे लक्ष यशस्वी या खेळीला किती पुढे नेऊ शकतो याकडे लागले आहे.





