Suryakumar Yadav excluded from Mumbai Ranji Trophy Squad : भारतीय देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात मोठी स्पर्धा असलेल्या रणजी ट्रॉफीच्या 2025-26 हंगामाला 15 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. यानिमित्ताने मुंबई क्रिकेट संघटनेने आपल्या 16 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. या संघाचे कर्णधारपद भारतीय अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकुर याच्याकडे सोपवण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या हंगामासाठी मुंबईच्या संघात भारतीय टी-20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याला स्थान देण्यात आलेले नाही. सूर्यकुमार संघातून वगळण्यामागील कारण काय? मागील हंगामात सूर्यकुमार यादव मुंबईच्या रणजी संघाचा सद्सय होता. मात्र, यंदा त्याला संघातून वगळण्यात आले आहे. यामागील नेमके कारण स्पष्ट करण्यात आलेले नसले, तरी सूर्यकुमारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील व्यस्त वेळापत्रकामुळे हा निर्णय घेण्यात आला असावा, असे मानले जात आहे. सूर्यकुमार लवकरच ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे, जिथे भारतीय संघाला यजमान ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळायची आहे. सूर्यकुमारचा प्रथम श्रेणी क्रिकेटमधील विक्रम पाहता, त्याने 86 सामन्यांमध्ये 42.33 च्या सरासरीने 5758 धावा केल्या असून, यामध्ये 14 शतके आणि 30 अर्धशतकांचा समावेश आहे. हेही वाचा – IND vs WI : जैस्वालने जोरदार धडक झाल्यानंतर गिलची घेतली फिरकी, VIDEO होतोय व्हायरल मुंबईचा पहिला सामना जम्मू-काश्मीरविरुद्ध – रणजी ट्रॉफी 2025-26 हंगामात मुंबईचा संघ एलिट गट-डी मध्ये आहे. या गटात जम्मू-काश्मीर, पुद्दुचेरी, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश, हैदराबाद, राजस्थान आणि दिल्ली यांचा समावेश आहे. मुंबई आपला पहिला सामना 15 ते 18 ऑक्टोबर दरम्यान श्रीनगरच्या शेर-ए-काश्मीर स्टेडियमवर जम्मू-काश्मीरविरुद्ध खेळणार आहे. हेही वाचा – Rohit Sharma : रोहित शर्माचा गगनचुंबी षटकार अन् स्वतःच्या लॅम्बोर्गिनीची फुटली काच, पाहा VIDEO मुंबईचा रणजी ट्रॉफी 2025-26 साठीचा संघ: मुंबईच्या संघात शार्दुल ठाकुर (कर्णधार), आयुष म्हात्रे, आकाश आनंद (यष्टीरक्षक), हार्दिक तमोरे (यष्टीरक्षक), सिद्धेश लाड, अजिंक्य रहाणे, सर्फराझ खान, शिवम दुबे, शम्स मुलानी, तनुष कोटियन, तुषार देशपांडे, सिल्वेस्टर डिसूजा, इरफान उमैर, मुशीर खान, अखिल हेरवाडकर आणि रॉयस्टन डायस.