IND vs SA Yashasvi Jaiswal equals Sachin Tendulkar’s record : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटीत भारतीय संघ मोठ्या पराभवाच्या छायेखाली आहे. पहिल्या कसोटीतील पराभवानंतर, दुसऱ्या सामन्यातही पाहुण्या संघाने आपले वर्चस्व कायम राखले आहे. परिणामी, भारतीय संघ २५ वर्षांनंतर प्रथमच दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका गमावण्याच्या मार्गावर आहे. या सामन्यात भारतीय फलंदाजांकडून अत्यंत निराशाजनक कामगिरी झाली असताना, यशस्वी जैस्वालने मात्र एका मोठ्या विक्रमाची नोंद केली आहे. भारताचा फ्लॉप शो आणि दक्षिण आफ्रिकेची मोठी आघाडी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेने मुथुसामीचे शतक आणि मार्को यानसनच्या ९३ धावांच्या जोरावर पहिल्या डावात ४८९ धावांचा डोंगर उभा केला. या विशाल धावसंख्येचा पाठलाग करताना भारतीय संघाचा पहिला डाव अवघ्या २०१ धावांवर आटोपला. यासह दक्षिण आफ्रिकेला पहिल्या डावात ३१४ धावांची प्रचंड मोठी आघाडी मिळाली आहे. त्यामुळे पराभवाच्या उंबरठ्यावर असतानाही, यशस्वी जैस्वालने केलेली ही विक्रमी कामगिरी भारतीय क्रिकेटसाठी एक आशेचा किरण ठरली आहे. जैस्वालने सचिनच्या विक्रमाची केली बरोबरी – पहिल्या डावात भारतीय फलंदाजांचा संपूर्णपणे फ्लॉप शो असताना, यशस्वी जैस्वाल हा एकमेव यशस्वी फलंदाज ठरला. त्याने ५८ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. या खेळीमुळे त्याने महान फलंदाज सचिन तेंडुलकरच्या एका खास विक्रमाशी बरोबरी केली आहे. २३ वर्षीय जैस्वालच्या कसोटी कारकिर्दीतील हे २० वे अर्धशतक (७ शतकांसह) ठरले आहे. हेही वाचा – IND vs SA : मार्को यान्सनचा गुवाहाटीत ‘डबल धमाका’! टीम इंडियाला धूळ चारत केला २५ वर्षांतील सर्वात मोठा विक्रम आपल्या कसोटी कारकिर्दीतील २८ व्या सामन्यांपर्यंत त्याने ४९.९ च्या सरासरीने २४९८ धावा केल्या आहेत. या सामन्यात ५० धावांचा टप्पा पार करताच, यशस्वी जैस्वाल हा २४ वर्षांचा होण्यापूर्वी सर्वाधिक वेळा ५० पेक्षा अधिक धावा करणारा सचिन तेंडुलकरनंतरचा केवळ दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. हा पराक्रम करणारा तो २१ व्या शतकातील पहिलाच भारतीय खेळाडू आहे. कसोटी क्रिकेटच्या १४८ वर्षांच्या इतिहासात केवळ ६ फलंदाजांना हा विक्रम करता आला आहे, ज्यात केन विलियम्सन आणि ॲलेस्टर कुक यांचा समावेश आहे. सचिन तेंडुलकरने १९८९ ते १९९७ या कालावधीत २९ अर्धशतके झळकावली होती. तर, यशस्वी जैस्वालने २०२३ ते २०२५ या कमी कालावधीत २० अर्धशतके झळकावत केन विलियम्सनच्या (२०१० ते २०१४ दरम्यान २० अर्धशतके) विक्रमाची बरोबरी केली आहे.