Yash : ‘TOXIC’ मधील किसिंग सीन चर्चेत येताच यशचा यूटर्न; अभिनेता म्हणाला, “मी काहीच केलेलं नाही…”
या वक्तव्यामुळे ‘टॉक्सिक’मधील इंटिमेट सीन्सकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन समोर आला आहे. यशने स्पष्ट केलं की....

Yash : ‘KGF’नंतर रॉकिंग स्टार यश पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याचा बहुप्रतिक्षित ‘टॉक्सिक : अ फेयरीटेल फॉर ग्रोन-अप्स’ हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच प्रचंड चर्चेत आला आहे. कधी यशचा दमदार लूक, कधी अंगावर काटा आणणारे अॅक्शन सीन्स, तर कधी चित्रपटातील बोल्ड आणि इंटिमेट प्रसंगांमुळे सोशल मीडियावर ‘टॉक्सिक’ची जोरदार चर्चा सुरू आहे.
विशेष म्हणजे या चित्रपटात यशसोबत तब्बल पाच अभिनेत्री दिसणार असल्याने प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे. कियारा अडवाणी, नयनतारा, हुमा कुरेशी, तारा सुतारिया आणि रुक्मिणी वसंत या पाच अभिनेत्री चित्रपटाचा महत्त्वाचा भाग आहेत.
ट्रेलर आणि प्रमोशनल कंटेंट समोर आल्यानंतर यश आणि त्याच्या सहकलाकारांमधील केमिस्ट्रीही चर्चेचा विषय ठरली. त्यात कियारा अडवाणी आणि तारा सुतारिया यांच्या व्यक्तिरेखांकडे विशेष लक्ष वेधले गेले. याचदरम्यान यश नुकताच ‘आप की अदालत’मध्ये सहभागी झाला आणि चित्रपटातील इंटिमेट सीन्सबद्दल त्याने केलेल्या वक्तव्याने आता चर्चेला आणखी उधाण आले आहे.
इंटिमेट सीन्सबद्दल बोलताना यशने अत्यंत स्पष्ट भूमिका मांडली. अभिनेत्याने सांगितले की, अशा दृश्यांकडे केवळ बोल्ड किंवा सनसनाटी प्रसंग म्हणून पाहता कामा नये. चित्रपटाच्या कथेला आणि दिग्दर्शकाच्या दृष्टिकोनाला अनुसरून एखादं दृश्य कसं सादर केलं जातं, हे त्याच्यासाठी महत्त्वाचं आहे.
यशच्या म्हणण्यानुसार, “मला एक मर्यादा माहीत आहे. तुम्हाला सौंदर्यदृष्ट्या चित्रीकरण करावं लागतं आणि नंतर जे दृश्य आकर्षक दिसतं, तोच सिनेमाचा प्रभाव असतो. तो एका निर्मात्याचा आवाज असतो. अश्लीलता चुकीचीच आहे. मी किससुद्धा केलेला नाही. तुम्ही पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल.’
त्याच्या या वक्तव्यामुळे ‘टॉक्सिक’मधील इंटिमेट सीन्सकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन समोर आला आहे. यशने स्पष्ट केलं की, एखादं दृश्य केवळ प्रेक्षकांचं लक्ष वेधण्यासाठी नसून त्या मागे चित्रपटाच्या कथानकाचा आणि निर्मात्याच्या दृष्टिकोनाचा संदर्भ असतो.
‘टॉक्सिक’मध्ये फक्त अॅक्शन नाही, भावनाही महत्त्वाच्या!
‘टॉक्सिक’ हा केवळ अॅक्शन किंवा गँगस्टर ड्रामा नाही, तर त्यामध्ये भावनिक स्तरावरही अनेक पदर असल्याचे यशने सांगितले आहे. दिग्दर्शिका गीतू मोहनदास यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या चित्रपटात यश राया नावाची व्यक्तिरेखा साकारत आहे.
गोव्यातील 1940 ते 1970 या कालखंडाच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारी विश्वात एका व्यक्तीचा उदय आणि त्याभोवतीचे सत्तासंघर्ष, नातेसंबंध आणि नैतिक द्वंद्व दाखवले जाणार आहे. यशने या चित्रपटाच्या लेखनातही सहभाग घेतला असून तो या सिनेमाचा निर्माता देखील आहे.
हा सिनेमा 26 ऑगस्ट 2026 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपट कन्नडसोबत हिंदी, इंग्रजी, तेलुगू, तमिळ आणि मल्याळम भाषांमध्ये असणार आहे. म्हणूनच आता चाहत्यांच्या नजरा 26 ऑगस्टकडे लागल्या आहेत.






