WTC Final 2025 : भारत-ऑस्ट्रेलियाची विजयाची टक्केवारी समान राहिल्यास काय होईल, कोण करेल अंतिम फेरीत प्रवेश; जाणून घ्या…

WTC Final 2025 Scenario For India & Australia | भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर मालिकेतील पाचवी आणि शेवटची कसोटी सिडनी येथे खेळवली जाणार आहे. हा सामना भारतासाठी खूप महत्त्वाचा आहे कारण जर टीम इंडिया यात हरली तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) च्या फायनलमध्ये जाण्याच्या त्याच्या सर्व शक्यता बंद होतील.
दुसरीकडे, कांगारू संघ हा सामना जिंकल्यास अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेचा सामना करण्यास पात्र ठरेल. कांगारू संघाची विजयाची टक्केवारी सध्या 61.46 आहे आणि ते WTC गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. या यादीत दक्षिण आफ्रिका अव्वल स्थानावर आहे आणि त्यांनी WTC फायनलमध्ये आपले स्थान निश्चित केलं आहे.
भारत या यादीत 52.78 विजयाच्या टक्केवारीसह तिसऱ्या स्थानावर आहे. मेलबर्न येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या पराभवामुळे संघाचे मोठे नुकसान झाले आहे. जर टीम इंडिया ऑस्ट्रेलियाला सिडनीमध्ये पराभूत करण्यात यशस्वी ठरली आणि नंतर श्रीलंका ऑस्ट्रेलियाविरुद्धची आगामी कसोटी मालिका ड्रॉ करण्यात किंवा जिंकण्यात यशस्वी ठरली, तर त्याचा फायदा भारताला होईल.
तेव्हा भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही देशांची विजयी टक्केवारी 55.26% असेल. कांगारू संघाला हे नको आहे कारण सध्या ते चांगल्या स्थितीत आहेत आणि WTC फायनलमध्ये जाण्यासाठी प्रबळ दावेदार आहेत. पण असे झाल्यास भारताला WTC फायनलसाठी पात्र ठरण्याची संधी असेल.
Who will join South Africa at Lord’s in June 2025? #WTC scenarios 👉 https://t.co/JHhtCaLIZ9 pic.twitter.com/Vbe6vJew7W
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) December 30, 2024
आयसीसीचा नियम काय सांगतो..?
आयसीसीच्या नियमांमध्ये असे स्पष्टपणे नमूद केले आहे की जर संघांनी समान विजयाच्या टक्केवारीसह गट टप्पा पूर्ण केला, तर अधिक मालिका जिंकणारा संघ अंतिम फेरीत प्रवेश करेल. सध्याच्या WTC सायकलमध्ये भारताने अधिक कसोटी खेळल्या असल्याने आणि चांगली कामगिरी केल्यामुळे ते अंतिम फेरीसाठी पात्र ठरतील.
भारताला अंतिम फेरीत प्रवेश कसा मिळेल?
भारताची WTC फायनलमध्ये पोहोचण्याची शक्यता आता त्यांच्या हातात नाही, हा भारतीय चाहत्यांसाठी नक्कीच मोठा धक्का आहे. यंदा न्यूझीलंडविरुद्धच्या घरच्या कसोटी मालिकेपूर्वी सर्व काही त्याच्या बाजूने होते, पण तेव्हा न्यूझीलंडविरुद्ध आणि आता मेलबर्नमध्ये संघाच्या पराभवानंतर चित्र पूर्णपणे बदललं आहे.
टीम इंडियानं सिडनीमध्ये विजय मिळवल्यानंतर श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाला घरच्या मैदानावर विजय मिळवू देऊ नये, अशी प्रार्थना संघ करेल. येथे श्रीलंकेने मालिका 1-0 किंवा 2-0 ने जिंकली तर त्याचा फायदा भारताला होईल.





