WTC Final 2025 : पॅट कमिन्सने डब्ल्यूटीसी फायनलमध्ये रचला इतिहास; बुमराह-विलिसचे विक्रम धुळीस!

WTC Final 2025 Pat Cummins Record Breaking Performance : मोठ्या सामन्यांमध्ये काहीतरी मोठं कर्तृत्व करून दाखवण्याची पॅट कमिन्सची जुनी सवय आहे. कर्णधारपदासोबतच गोलंदाजीतही कमिन्स अंतिम सामन्यांमध्ये बाजी मारण्यात मागे राहत नाही. असाच नजारा पुन्हा एकदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात पाहायला मिळाला. कांगारू कर्णधाराने आपल्या भेदक गोलंदाजीने डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाचा दमदार पुनरागमन घडवून आणलं. कमिन्सने कहर करताना अवघ्या २८ धावांत प्रोटियाज संघाच्या सहा फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.
कमिन्सने मोडला बुमराहचा विक्रम
ऑस्ट्रेलियाच्या कर्णधाराच्या हातून डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यात असा स्पेल आला, जो वर्षानुवर्षे स्मरणात राहील. त्याने दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजीला उद्ध्वस्त करत टेस्ट क्रिकेटमध्ये आपले ३०० विकेट्स पूर्ण केले. हा टप्पा गाठणारा तो सहावा ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज ठरला. शिवाय, विश्व टेस्ट चॅम्पियनशिपच्या या चक्रात सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज होण्याचा मानही कमिन्सने मिळवला. त्याने जसप्रीत बुमराहला मागे टाकले, ज्याच्या नावावर या चक्रात ७७ विकेट्स होत्या.
विलिसचा ३३ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला –
𝑷𝒂𝒕 𝑪𝒖𝒎𝒎𝒊𝒏𝒔 𝒄𝒓𝒆𝒂𝒕𝒆𝒔 𝒉𝒊𝒔𝒕𝒐𝒓𝒚 𝒂𝒕 𝑳𝒐𝒓𝒅’𝒔! 🔥
He now holds the best Test bowling figures by a captain at the iconic venue, surpassing Bob Willis’ 6/101 from 1982. 🇦🇺📜#PatCummins #Australia #Tests #Captain #Sportskeeda pic.twitter.com/6x0kpwfYJW
— Sportskeeda (@Sportskeeda) June 12, 2025
विश्व टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात पॅट कमिन्सने एका डावात ६ विकेट्स घेऊन जगातील पहिला गोलंदाज होण्याचा मान मिळवला आहे. कर्णधार म्हणून कमिन्सने ९व्यांदा एका डावात ५ विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे. यासह त्याने बिशन सिंग बेदी यांचा विक्रम मागे टाकला आहे. तसेच, कर्णधार म्हणून लॉर्ड्सच्या मैदानावर सर्वोत्तम गोलंदाजीचा विक्रमही कमिन्सने आपल्या नावावर केला आहे. त्याने बॉब विलिस यांचा ३३ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला आहे.
पॅट कमिन्सने केला कहर –
पहिल्या दिवशी पहिल्या ४ विकेट्स गमावल्यानंतर, दुसऱ्या दिवशी टेम्बा बावुमा आणि डेव्हिड बेडिंगहॅम यांनी दक्षिण आफ्रिकेचा डाव काही प्रमाणात सांभाळला होता. धावफलकावर ९४ धावा झाल्या होत्या. यानंतर पॅट कमिन्सचा घातक स्पेल येथून सुरू झाला. कांगारू कर्णधाराने प्रथम बावुमाला ३६ धावांवर बाद केले. त्यानंतर काइल व्हेरेनही फक्त १३ धावांवर बाद झाला.कमिन्सने मार्को जॅन्सनला खाते उघडण्याची संधीही दिली नाही आणि त्याला शून्यावर पॅव्हेलियनमध्ये पाठवले. दक्षिण आफ्रिकेसाठी एकट्याने लढणाऱ्या डेव्हिड बेडिंगहॅमलाही कमिन्सने बाद केले. त्याच वेळी, रबाडाला एका धावेवर बाद करण्यासोबतच, कमिन्सने संपूर्ण दक्षिण आफ्रिकेचा संघ फक्त १३८ धावांवर उध्वस्त केला.





