पुणे | लोहमार्ग पोलीस भरतीसाठी उद्या लेखी परीक्षा

पुणे ,{प्रभात वृत्तसेवा} – पुणे लोहमार्ग पोलीस दलातील भरती प्रक्रियेत रविवारी (७ जुलै) लेखी परीक्षा होणार आहे, अशी माहिती पुणे लोहमार्ग पोलीस दलाचे अधीक्षक तुषार दोशी यांनी केले आहे.
पुणे लोहमार्ग पोलीस दलातील पोलीस शिपाईपदाच्या ५० जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. ५० जागांसाठी तीन हजारांहून अधिक अर्ज दाखल करण्यात आले होते. त्यापैकी १,६०० उमेदवार मैदानी चाचणीसाठी पात्र झाले होते.
उमेदवारांपैकी मैदानी चाचणी, गुणवत्ता यादी, जात प्रवर्गनिहाय, समांतर आरक्षणानुसार एकास दहा याप्रमाणे ३८३ जणांची लेखी परीक्षेसाठी निवड करण्यात आली आहे.
लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या नावांची यादी punerailwaypolice.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. मैदानी चाचणी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा रविवारी (७ जुलै) होणार आहे. परीक्षा लष्कर भागातील ए. के. न्यू लॉ ॲकॅडमी अँड पीएचडी (लॉ) रिसर्च सेंटर, आझम कॅम्पस येथे होणार आहे.
उमेदवारांनी सकाळी सात वाजता परीक्षा केंद्रावर हजर रहावे. सकाळी साडेनऊनंतर उमेदवारांना परीक्षा केंद्रात प्रवेश देण्यात येणार नाही. परीक्षेसाठी आवश्यक साहित्य लोहमार्ग पोलिसांकडून दिले जाणार आहे. पेन, पेन्सील, तसेच अन्य कोणतेही साहित्य उमेदवारांनी आणू नये, असे आवाहन दोशी यांनी केले आहे.





