कुस्तीपटू बबिता फोगट भाजपमध्ये प्रवेश करणार

महाविर फोगट यांनी दिला वृत्ताला दुजोरा
नवी दिल्ली : भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. विरोधी पक्षातले असो की सर्वसामान्य नागरिक असो सर्वांचीच भाजपला पसंती असल्याचे दिसत आहे. आता या यादीत आणखी एका व्यक्तीचे नाव येणार आहे ते म्हणजे राष्ट्रकुल पदक विजेती कुस्तीपटू बबिता फोगट. कुस्तीपटू महावीर फोगट यांच्यासोबत बबिता भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. भाजपामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे महावीर यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.
केंद्रासह राज्य सरकारचे कौतूक करत महाविर फोगट यांनी आपण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले. तसेच आपल्यासोबत बबितादेखील पक्षात प्रवेश करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी त्यांनी केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरच्या बाबतीत जो निर्णय घेतला तो अतियश योग्य असल्याचेही त्यांनी म्हटले. बबिताने हरयाणा पोलीस दलातील निरीक्षक पदाचा राजीनामा दिल्याचे फोगाट कुटुंबाने सांगितले. महावीर यांनी याआधी जननायक जनता पार्टीसाठी काम केलं आहे. जेजेपीच्या क्रीडासंबंधित विभागाची जबाबदारी त्यांच्याकडे होती. फोगाट कुटुंब दादरीतील बलाली गावात वास्तव्यास आहे. भाजपा प्रवेशानंतर बबिताला विधानसभा निवडणुकीत बाध्रा किंवा दादरी मतदारसंघातून तिकीट दिले जाण्याची शक्यता आहे.




