Vinesh Phogat disqualification : क्रीडा नियम सर्वांसाठी समान असतात – नेनाद लालोविच

Vinesh Phogat disqualification :- ते यावेळी म्हणाले, जे काही घडले त्याबद्दल वाईट वाटतंय, पण तुम्ही कोणत्या देशाचे आहात, तुमचा देश किती मोठा आहे याचा काही संबंध नाही, खेळाडू हे खेळाडू असतात. वजनाची चाचणी सर्वांसमोर केली जाते आणि तिथे काय घडले हे सर्वांनीच पाहिले आहे. एखाद्या खेळाडूचे वजन जास्त असेल हे दिसत असतानाही त्याला स्पर्धेत सहभागी होण्याची परवानगी कशी देणार. सर्वांसाठी नियम समान असतात व त्यांचे पालन करण्यापलीकडे आमच्याकडे काही पर्याय नव्हता, असे प्रतिपादन युनायटेड वर्ल्ड रेसलिंगचे प्रमुख नेनाद लालोविच (Nenad Lalovic) यांनी व्यक्त केले आहे.
आंतरराष्ट्रीय क्रीडा लवाद (कॅस) आता कुस्तीपटू विनेश फोगट प्रकरणी १३ ऑगस्ट रोजी आपला निकाल देणार आहे. विनेश फोगटला अतिरिक्त वजनामुळे ५० किलो वजनी गटाच्या फ्रीस्टाईल कुस्तीच्या सुवर्णपदक स्पर्धेतून अपात्र ठरवले. याच निर्णयाला विनेशने आव्हान दिले आणि पॅरिस ऑलिम्पिकमध्ये तिने युस्नेलिस गुझमन लोपेझसह संयुक्त रौप्य पदक देण्यासाठी ‘कॅस’कडे याचिका दाखल केली आहे. ‘कॅस’मध्ये अपील केल्यानंतर विनेशला रौप्यपदक मिळण्याच्या आशा निर्माण झाल्या आहेत पण निर्णयाची प्रतीक्षा वाढली आहे.
लालोविक पुढे म्हणाले, आम्ही खेळाडूंचा विचार करतच हा नियम आणला आहे. स्पर्धेसाठी खेळाडूंना वजनाच्या नियमांचे बंधन घालण्यात आले आहे. पुढे कदाचित नियमांमध्ये काही फेरबदल करता येतील, पण आम्ही नियम बदलत नाही आहोत. आमच्या वैद्यकीय आयोगाद्वारे आम्हाला सल्ला दिला जातो. ते कोणत्याही बदलाच्या पूर्णपणे विरोधात आहेत.
दुसऱ्या पदकाची तरतूदच नाही
५० किलो महिलांच्या फ्रीस्टाइल कुस्तीमध्ये सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदकाचे सामने झाले असून पदके वितरित देखील करण्यात आली, तर विनेशने दुसऱ्या दिवशी वजन चाचणी करण्यापूर्वीच अंतिम फेरी गाठल्यामुळे तिला संयुक्त-रौप्यपदक मिळावे असे आवाहन केले आहे. दुसरे रौप्य पदक देण्याची तरतूद नसली तरी विनेशने आशा सोडलेली नाही.


