Paris Olympics 2024 : “व्यायाम केला, केस कापले, रक्तही…” तरी अवघ्या 100 ग्रॅम वजनानं केला घात, विनेश अपात्र ठरल्यानंतर देशभरात हळहळ…

Paris Olympics 2024 (Vinesh Phogat) :- पंतप्रधान मोदींनी म्हटल्याप्रमाणे, विनेश तुच खरी आमची चॅम्पियन आहेस…अशाच काहीशा भावना कुस्तीपटू विनेश फोगट पॅरिस ऑलिम्पिकमधून अवघे १०० ते १५० किलो वजन जास्त भरल्यानंतर अखंड भारतीयांच्या मनात होत्या. बुधवारी सकाळी केवळ विनेश अपात्र ठरली नाही तर भारताने पदकाची ‘सुवर्ण’संधी देखील गमावली आहे.
मंगळवारी रात्री उपांत्य फेरीतील सामन्यानंतर जेव्हा विनेशचे वजन करण्यात आले तेव्हा ५२ किलो असल्याचे समजले. त्यामुळे, विनेशने मंगळवारी रात्री वजन कमी करण्यासाठी प्रयत्नांची परकाष्ठा केली. तिने जॉगिंग केले, दोरीवरच्या उड्या मारल्या, त्यानंतर सायकलिंगही केली. एवढंच काय विनेशने तिचे केस कापले, नखं कापली, रक्तही देखील काढलं, मात्र शेवटी जे व्हायचं ते झालंच… बुधवारी सकाळी विनेशला वजनासाठी बोलावण्यात आले तेव्हा तिचे वजन 50 किलो 200 ग्रॅम होते. तेव्हा तिला वजन कमी करण्यासाठी 15 मिनिटे देण्यात आली होती. ज्यामध्ये ती फक्त ५० ग्रॅम वजन कमी करू शकली. तिचे वजन १५० ग्रॅम जास्त भरले. आणखी ५० ग्रॅम वजन जर विनेश कमी करु शकली असती तर ती अंतिम स्पर्धेत खेळू शकली असती.
कुस्तीचा नियम काय सांगतो?
कुस्तीमध्ये, कोणत्याही कुस्तीपटूला फक्त १०० ग्रॅम जास्त वजनाची सूट मिळते. म्हणजेच, विनेशचे वजन ५० किलो १०० ग्रॅम भरले असते, तर ती सुवर्ण पदकाची लढत खेळू शकली असती, पण तिचे वजन त्याव्यतिरिक्त आणखी ५० ग्रॅम जास्त होते आणि त्यामुळे तिचे ऑलिम्पिक पदक जिंकण्याचे स्वप्न भंगले आणि ती अपात्र ठरली. कुस्तीमध्ये कुस्तीच्या सामन्यांपूर्वी पैलवानांचे वजन केले जाते. याशिवाय कुस्तीपटूला त्याच श्रेणीत आपले वजन दोन दिवस राखायचे असते. मात्र विनेशला तसे करता आले नाही.
बजरंगने व्यक्त केली होती भिती
भारतातील अंदोलनात सातत्याने विनेशसोबत असलेल्या बजरंग पुनियाने तिच्या अपात्रेनंतर आता प्रतिक्रीया दिली आहे. तो म्हणाला, माझे विनेशशी बोलणे झाले होते. तेव्हा मी आता पहिले टार्गेट हे अंतिम लढतीकडे राहुदे, असे म्हटले होते. कारण कोणताही खेळाडू विजयाच्या आधी जल्लोष करत नाही. जर विजयाच्या आधीच आनंद व्यक्त केला आणि त्यामध्येच समाधान मानले तर त्याच्याकडून चांगली कामगिरी होत नाही. तसेच तसेच वजन कमी करण्यासंदर्भातही बोलणे झाल्याच पुनियाने यावेळी सांगितले. तो म्हणाला, ५० किलो वजनात खेळणे खूप कठीण होऊन जाते. वजन कमी करण्यामध्ये मुलगा आणि मुलीमध्ये खूप फरक असतो. कारण मुलाचे वजन लवकर कमी होते. पण मुलींना वजन कमी करण्यामध्ये अडचणी येतात. विनेशने वजन ५० किलोंवर आणले होते. यासाठी मागील काही महिन्यांपासून तिचा डाएट प्लॅन सुरु होता, असेही पुनियाने यावेळी म्हटले आहे.
गुझमन लोपेझला अंतिम फेरीत संधी
भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगटच्या अपात्रतेनंतर, क्यूबन कुस्तीपटू युस्नेलिस गुझमन लोपेझ आता पॅरिस ऑलिम्पिकच्या ५० किलो वजनी गटात अंतिम फेरीत अमेरिकेच्या साराह अँन हिल्डब्रँडशी लढणार आहे. विनेशने उपांत्य फेरीत लोपेझचा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली होती, मात्र सुवर्णपदकाच्या लढतीपूर्वी भारतीय कुस्तीपटूचे वजन जास्त आढळल्याने तिला अपात्र ठरवण्यात आले, ज्यामुळे तिचे सुवर्णपदक जिंकण्याचे स्वप्न भंगले. तर कांस्यपदकासाठी जपानची युई सुसाकी आणि युक्रेनची ओक्साना लिवाच यांच्यातील रेपेचेज सामना असेल.





