पुणे : जगभरातील व्यक्तींना एकमेकांशी जोडण्यात टपाल हे एक महत्त्वाचे साधन ठरले. जगात ९ ऑक्टोबर १८७४ साली टपाल सेवा सुरु झाली. त्यामुळे ९ ऑक्टोबर हा दिवस जागतिक टपाल दिवस म्हणून सर्वत्र साजरा करण्यात येतो. याचेच औचित्य साधत तब्बल ८८ वर्षांची आपली सुवर्ण परंपरा जपणाऱ्या आणि पुण्यातील प्रसिद्ध सुवर्णपेढी म्हणून नावलौकिक मिळविलेल्या कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर्स अर्थात केआरए ज्वेलर्सच्या वतीने आगळ्यावेगळ्या पद्धतीने जागतिक टपाल दिन साजरा करण्यात आला. यावेळी केआरए ज्वेलर्सच्या वतीने दालनांच्या आजूबाजूच्या स्थानिक पोस्टमनला केआरएच्या दालनांमध्ये आमंत्रित करीत त्यांच्या सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करीत त्यांचे आभार मानण्यात आले. केआरए ज्वेलर्सच्या प्रयत्नांतून सदर उपक्रम आणि टपाल दिन साजरा करण्यात आला. यावेळी पुण्याच्या टपाल खात्याचे वरिष्ठ पोस्ट मास्टर प्रमोद भोसले, डेप्युटी पोस्टमास्टर यामाजी बांबळे, पब्लिक रिलेशनशिप इन्स्पेक्टर अनुप नहाटे, एक्स सेर्विसमन कॉलनी पोस्ट ऑफिसमधील सब पोस्टमास्टर राजू गवारी, विमान नगर पोस्ट ऑफिसचे पब्लिक रिलेशनशिप अधिकारी प्रकाश कदम, बारामती पोस्ट ऑफिसचे उपअधिक्षक राजकुमार बळीराम घायाळ यांना केआरएच्या दालनांमध्ये बोलावत त्यांचा मानपत्र व भेटवस्तू देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. या संकल्पानेविषयी अधिक माहिती देताना अतुल अष्टेकर म्हणाले, “आपण सर्वच जण दिव्यांचा, आनंदाचा आणि सुट्ट्यांचा सण अर्थात दिवाळी साजरे करण्यासाठी उत्सुक असताना पोस्टमन मात्र संपूर्ण निष्ठेने दिवाळीची शुभेच्छा पत्रे, पार्सल्स, भेटवस्तू अनेकांपर्यत पोहोचविण्यासाठी मेहनत घेत असतात. दिवाळीच्या आधीपासूनच त्यांची दिवस रात्र सुरु असलेली धावपळ आपण पाहतो. कित्येक वर्षे पोस्टमन नि:स्वार्थीपणे आपले हे काम करत असतात. त्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी यावर्षी जागतिक टपाल दिवस साजरा करण्याचे आम्ही ठरविले. समाजातील प्रत्येक घटकाच्या योगदानाचा सन्मान करणे हीच खरी सणामागील भावना आहे असे मानतो, आणि त्याच उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.”